आलापल्ली : जिल्ह्यात मधसंकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मधसंकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सेवायोजन कार्यालय कुचकामीच
गडचिरोली : पूर्वी येथील सेवा योजन कार्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मुलाखत पत्र पाठविण्यात येत होते. मात्र ऑनलाइन नोंदणी झाल्यामुळे बेरोजगारी नोंदणी करण्यासाठी कार्यालयात येत नाही.
उपकेंद्रांना इमारती नाही
गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. परिणामी दुर्गम भागात नागरिकांना त्रास हाेताे.
साखरा बसथांब्यावर गतिरोधक उभारा
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने साखरा येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकाअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत.
ग्रामपंचायत संगणक योजनेचा बोजवारा
सिरोंचा : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनतेची कामे तत्काळ व्हावी, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायतींना संगणक संच पुरविले. मात्र अनेक संगणक नादुरुस्त स्थितीत असून, काही धूळ खात आहेत. परिणामी ग्रामपंचायतीच्या ऑनलाइन कामाचा बोजवारा उडाला आहे.
चामोर्शीतील तलावाचे सौंदर्यीकरण करा
चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही, त्यामुळे शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. तलावालगत काही नागरिकांनी शेणखताचे ढिगारे ठेवले आहेत.
शासकीय विहिरीवर खासगी पंपांचा कब्जा
काेरची : तालुक्यातील अनेक शासकीय विहिरींवर खासगी पाणी पंप लावण्यात आले आहेत. मात्र याबाबत ग्रामीण भागातील नागरिक तक्रार करीत नाही. ग्रामपंचायतीने स्वत: दखल घेऊन अशा प्रकारच्या अवैध मोटार काढणे आवश्यक असतानाही दुर्लक्ष आहे.
परवानगीविनाच घरांचे बांधकाम वाढले
देसाईगंज : नगर परिषद क्षेत्रात घराचे बांधकाम करायचे असेल तर नगर परिषदेकडून रितसर परवानगी घ्यावी लागते. मात्र शहरातील बहुतांश घरमालक नगर परिषदेकडे परवानगी न घेताच घरांचे बांधकाम करीत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. नगर परिषदेने कारवाई करण्याची गरज आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना धोका
भामरागड : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगर पंचायतीची आहे. स्थानिक नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी आहे.
ऑनलाइन सातबारा झाला डोकेदुखी
एटापल्ली : ऑनलाइन सातबारा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा तलाठी कार्यालयामार्फत पुरवावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. ऑनलाइन सातबारा काढण्यासाठी अधिकचे पैसे मोेजावे लागत आहेत.
पट्टे वाटपासाठी अट शिथिल करा
धानोरा : गैरआदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. सदर अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदारांच्या मार्फतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र, ७५ वर्षांची अट असल्याने अनेक दावे प्रलंबित आहेत.
जननी योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
आलापल्ली : शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. खमनचेरू प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येते.
दुर्गम भागातील गावांना रस्ते नाहीत
गडचिरोली : जिल्हा निर्मितीला ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही अजूनही शेकडो गावे रस्त्यांनी जोडली गेली नाहीत. या गावांना पायवाटेनेच प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यामध्ये या गावांचा संपर्क तुटतो. या गावांमध्ये रस्त्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त
गडचिरोली : गडचिरोली शहरातील विविध वॉर्डांत नाल्या गाळाने भरून असल्याने डासांची पैदास वाढली आहे. अनेक ठिकाणी गटारे निर्माण झाली आहेत. अशा अस्वच्छतेच्या ठिकाणी डुकरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने नाल्या व गटारे, डबक्यांच्या परिसरात फवारणी करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
बायोमेट्रिक प्रणालीचा फज्जा
भामरागड : शासनाने कर्मचाऱ्यांच्या नियमित हजेरीकरिता अनेक कार्यालयांत बायोमेट्रिक मशीन बसविलेल्या आहेत. भामरागडातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सोडले, तर बऱ्याच कार्यालयात ही बायोमेट्रिक मशीन बंद पडलेली आहे.
अनेक इमारतींवर वीजरोधक यंत्रणा नाही
अहेरी : उंच इमारतींवर वीजरोधक यंत्रणा बसविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या यंत्रामध्ये इमारतींवर वीज कोसळल्यास वीजरोधक यंत्र वीज खेचून घेऊन तिला सुरक्षितरीत्या जमिनीत पोहोचवितो. त्यामुळे इमारतीस व त्यात राहणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा अपाय होत नाही, परंतु शहरातील अनेक इमारतींवर या यंत्राचा अभाव असल्याचे आढळून आले आहे.
सीमावर्ती भागातील गावे दुर्लक्षितच
गडचिरोली : छत्तीसगड, आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील औद्योगिक विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग निर्माण न झाल्याने बेरोजगारी वाढली आहे. शासनाच्या विविध योजना या भागात पोहोचत नसल्याने, नागरिकांमध्येही उदासीनता दिसून येते.
कुरखेडा रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवा
कुरखेडा : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांची व्यवस्था आहे. या रुग्णालयात कुरखेडा, कोरची, देसाईगंज तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे १०० खाटांची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे, परंतु या मागणीकडे अनेक दिवसांपासून दुर्लक्ष होत आहे. सातत्याने मागणी करूनही आराेग्य विभागाने या रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविली नाही. परिणामी येथून रुग्ण रेफर हाेत आहे.