सिराेंचा : सिराेंचा तालुक्यात धानपीक, कापूस, मका व मिरची पिकाचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी ८०० हेक्टरवर मिरची पिकाची लागवड करण्यात आली. दरवर्षी मिरची पिकातून ३२ काेटींची उलाढाल हाेते. हमखास राेजगाव व आर्थिक पाठबळ देणारे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पिकाची ताेडणी सध्या सुरू झाली आहे. सिराेंचा तालुक्यात बहुतांश शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात. त्यामुळे पक्की मिरची ताेडण्यासाठी बाहेर गावाहून जवळपास २ हजार मजूर येतात. चार महिने हा राेजगार मजुरांना मिळताे. निवासी राहून मजूर मिरची ताेडतात. मिरची पीक लागवडीकरिता एकरी जवळपास ५० ते ६० हजारांचा खर्च येताे. एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादन शेतकरी घेतात. विशेष म्हणजे, तेलंगणा राज्यातील अनेक शेतकरी भाडेतत्वावर शेती कसतात. जवळपास २ हजार मजुरांना या माध्यमातून राेजगार मिळताे.
बाॅक्स
नागपूरच्या बाजारात वेगळी ओळख
सिराेंचा तालुक्यातील मिरची नागपूर येथील बाजारपेठेत पाठविली जाते. त्यामुळे येथील मिरचीची वेगळी ओळख नागपुरात निर्माण झाली आहे. मागील वर्षी काेराेनामुळे मिरची विक्रीस अडचणी आल्या. वातानुकुलीत गाेदामात मिरची ठेवण्यात आली हाेती. तरीसुद्धा मिरचीला याेग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी हताश झाले. यावर्षी मिरची पिकाचे भरघाेस उत्पादन हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे याेग्य भाव मिरची पिकाला मिळावा, अशी आशा मिरची उत्पादक शेतकरी बंदेला रमेश सत्यम यांनी व्यक्त केली.