आरमाेरी : गडचिरोली जिल्ह्यात दुधाळ जनावरांची संख्या घटायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होत चालले आहे. सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात ८०पेक्षा अधिक दुग्ध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. मात्र, यातील अनेक संस्था बंद पडल्या आहेत. या संस्था पुनर्जीवित करण्याची गरज आहे.
फलकाअभावी अपघाताचा धाेका
घोट : घोट-रेगडी-विकासपल्ली मार्गाला जोडणाऱ्या निकतवाडा-नवेगाव या मार्गावर गतिरोधक आहे. मात्र, गतिरोधक फलक नाही. त्यामुळे सायंकाळी व रात्रीच्या सुमारास अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने मागणी करूनही संबंधित विभागाने याठिकाणी गतिरोधक फलक लावलेला नाही.
झाडांच्या फांद्यांनी झाकोळले पथदिवे
वैरागड : परिसरात बहुतांश गावांमधील पथदिव्यांसमोर झाडाच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पोहोचत नाही. काही पथदिवे वेलींनी झाकोळले आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पथदिव्यांसमोरील फांद्या तोडाव्यात, अशी मागणी होत आहे.
वन जमिनीवर अतिक्रमण वाढले
आलापल्ली : जिल्ह्याच्या पाचही वन विभागात अनेक नागरिकांनी वन जमिनीवर मिळेल त्याठिकाणी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. गरज नसतानाही लोक अतिक्रमण करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होण्याचा धोका आहे. वन विभागातील कर्मचाऱ्यांनी कठाेर कारवाई करण्याची गरज आहे.
विमा नसलेल्या वाहनांवर कारवाई करा
आलापल्ली : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. विम्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा नागरिक विमा काढत नसल्याचे दिसून येत आहे. एखाद्यावेळी अपघात घडल्यास विमा कंपनीवर दावा ठाेकून अपघातग्रस्त व्यक्तीला नुकसानभरपाई मिळू शकते.
सिकलसेल संशोधन केंद्र स्थापन करा
एटापल्ली : जिल्ह्यात सिकलसेल वाहक रूग्णांची संख्या १० ते १२ हजारांवर आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्यात सिकलसेलचे प्रमाण जास्त असल्याने सिकलसेल संशोधन केंद्र स्थापन करावे, अशी मागणी होत आहे.
विद्युत खांबांमुळे रस्ता झाला अरूंद
गडचिरोली : शहरातील आरमोरी मार्गावर विद्युत खांब रस्त्यावर असल्याने हे खांब बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र, याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
प्रसुती रजा मंजुरीच्या प्रतीक्षेत
एटापल्ली : महिला कर्मचाऱ्यांना गरोदरपणा व प्रसुती काळासाठी ६ महिने म्हणजे १८० दिवसांची भरपगारी रजा दिली जाते. मात्र, प्रसुती रजा घेतलेल्या अनेक महिलांचे प्रसुती रजा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले नाहीत.
मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताला आमंत्रण
आरमोरी : सायगाव मार्गावरील डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडले असून, या मार्गावर जागोजागी लहान-मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचे कित्येकदा अपघात झाले आहेत. रात्रीच्या सुमारास हा मोठा खड्डा दुचाकीस्वारांना दिसत नसल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. अशाप्रकारचे खड्डे या मार्गावर अनेक ठिकाणी अद्यापही कायम आहेत.
वाहनांच्या गर्दीमुळे अपघाताचा धाेका
गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात चारही बाजूच्या मार्गावर पार्किंगसाठी लाईन आखून देण्यात आली आहे. मात्र, सायंकाळच्या सुमारास याठिकाणी जमणाऱ्या तरूणांचे याकडे दुर्लक्ष होते. पार्किंग लाईन ओलांडून रस्त्याच्या मध्यभागी वाहने ठेवली जात आहेत. खाेदकाम सुरू असताना वाहनांची गर्दी झाल्याने वाहतूक काेंडी हाेत आहे.
सोनसरीत भ्रमणध्वनी सेवा कुचकामी
कुरखेडा : तालुक्यातील सोनसरी, उराडी परिसरात बीएसएनएलची भ्रमणध्वनी व दूरध्वनी सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे शिक्षकांकडून होणारे सरल प्रणालीचे ऑनलाईन काम प्रभावित झाले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. टाॅवरचे बांधकाम झाल्यानंतर नागरिकांनी माेबाईल खरेदी केले. मात्र, कव्हरेज नसल्याने माेबाईल कुचकामी झाले आहेत.
जुन्या पुलांना बंधाऱ्यात रूपांतर करा
गडचिराेली : कठाणी नदीसह अनेक ठिकाणी नवीन उंच पूल बांधले आहेत. जुने व ठेंगणे पूलसुध्दा कायम आहेत. या पुलांना दरवाजे बसवल्यास बॅरेजप्रमाणे नदीत काही किलाेमीटर अंतरावर पाणी साचून राहील. यामुळे सिंचनाची सुविधा वाढून उत्पादन वाढण्यास मदत हाेईल.