मानापूर/देलनवाडी : देलनवाडी येथे आदिवासी सेवा सहकारी सोसायटी असून आदिवासी विकास महामंडळाची एजंसी म्हणून महामंडळाच्या निर्देशानुसार धान, गौण वनउपज खरेदी करीत असते. परंतु महामंडळाचे स्वतंत्र असे गोडावून नाही. येथे आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे दरवर्षी खरेदी केलेले धान्य गोडावूनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गोडावूनमध्ये पावसाळ्यासाठी लागणारे खत ठेवण्यासाठी जागा नाही. म्हणून सोसायटीचे गोडावून रिकामे करावे, अशी मागणी संचालक मंडळाने केली आहे.दरवर्षी खरेदी केलेले धान्य व इतर वस्तु गोडाऊनमध्ये ठेवल्या जातात. उर्वरित धान्य खुल्या जागेवर उघड्यावरच ठेवल्या जातात. दरवर्षी मे महिन्यात महामंडळातर्फे खरेदी केलेल्या वस्तुंची उचल केली जाते. परंतु यंदा देलनवाडी येथील गोडाऊनमध्ये ठेवलेल्या धान्याची उचल मे महिना लोटूनही करण्यात आली नाही. सोसायटीमार्फत दरवर्षी रासायनिक खत विक्रीचा व्यवसाय केला जातो. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी लागणारे खत ठेवण्यासाठी गोदामात जागा नाही. त्यामुळे गोदामात जागेविषयी अडचण निर्माण झाली आहे. यावर्षी महामंडळाचे सोसायटीने खरेदी केलेले अर्धे धान्य गोडाऊनमध्ये तर अर्धेच धान्य उघड्यावर पडून आहे. येत्या काही दिवसातच पावसाळ्यात सुरूवात होत असल्याने पाऊस आल्यास मोठ्या प्रमाणात धानाची नासाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु आदिवासी विकास महामंडळ अजुनही कुंभकर्णी झोपेत आहे. जिल्हाभरात कोट्यवधींचा धान्य साठा गोडाऊनअभावी सडत आहे. तरीही आदिवासी विकास महामंडळाच्या धोरणात बदल झालेला दिसून येत नाही.गोडाऊन अभावी आदिवासी विकास महामंडळाचे कोट्यवधीचे धान्य दरवर्षी पावसाळ्यात सडत असते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी देलनवाडी येथील गोडाऊनमध्ये बाहेर असलेल्या धान्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. परंतु धान्याचे व्यवस्थापन व खत ठेवण्यासाठी गोडाऊनमध्ये जागेची व्यवस्था करून देण्यात आली नाही. शेतकऱ्यांच्या व सोसायटीच्या हिताकरिता दरवर्षी सोयायटीमार्फत खत विक्री केली जाते. शेतकऱ्यांना रास्त भावात खत उपलब्ध सोसायटीमार्फत करून दिले जाते. त्यामुळे सोयायटीमार्फत खत विक्री सुरू केली नाही तर परिसरातील खासगी व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक व्यावसायिक मनमानीभावाने खताची विक्री करीत असतात. त्यामुळे खताची साठवणूक करण्याकरिता गोडाऊन खाली करावे. (वार्ताहर)
देलनवाडीतील सेवा सहकारी सोसायटीचे गोडाऊन रिकामे करा
By admin | Published: June 14, 2014 11:35 PM