गडचिरोली : जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने जिल्ह्यात पशुधनही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र पशुसंवर्धन विभागातील ग्रामीण भागातील पशुधन विकास अधिकाऱ्यांची तब्बल ६१ पदे रिक्त आहेत. तसेच वर्ग ३ व ४ ची १९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेकदा पशुवैद्यकीय दवाखान्यातील शिपायांनाच आजारी गुरांवर औषधोपचार करावा लागत आहे. परिणामी रिक्त पदांमुळे जिल्ह्यातील पशु वैद्यकीय सेवा प्रभावित होत असून जिल्ह्यातील पशुधन धोक्यात आले आहे. रिक्त असलेल्या गट अ च्या पशुधन विकास अधिकाऱ्यांमध्ये सिरोंचा तालुक्यातील कचलेर, टेकडाताला, अंकिसा, कोर्ला माल आदी गावातील पशु दवाखान्यांचा समावेश आहे. एटापल्ली तालुक्यात कचलेर, तोळगट्टा, बिडरी, तोडसा, कोटमी व हालेवारा येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. कुरखेडा तालुक्यातील चारभट्टी, रामगड, अड्याळ येथील पदे रिक्त आहेत. चामोर्शी तालुक्यातील कोनसरी, आष्टी, रेगडी, तुमडी, वायगाव, अड्याळ, गिलगाव, मुरमुरी, मुधोलीचक व घोट आदी ठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहेत. सिरोंचा तालुक्यातील टेकडाताला, कोर्ला माल आदी दवाखान्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम, गोविंदगाव, खमनचेरू, किष्टापूर, मेडपल्ली व वेलगूर आदी पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. भामरागड तालुक्यातील विसामुंडी, कोठी आदी पिकांचे पद रिक्त आहेत. धानोरा तालुक्यातील मोहली, येरकड, मेंढाटोला, पेंढरी, सुरसुंडी आदी ठिकाणचे चार पदे रिक्त आहेत. कोरची तालुक्यातील गॅरापत्ती, मसेली तर आरमोरी तालुक्यातील कोरेगाव (रांगी) व वैरागड आदी ठिकाणचे पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहेत. गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव, मौशिखांब, कुऱ्हाडी, मुरमाडी, गुरवळा आदी ठिकाणचे पद रिक्त आहे. मुलचेरा तालुक्यातील लगाम, अडपल्ली, मोहुर्ली आदी तीन गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. याशिवाय सिरोंचा आष्टी, धानोरा, गडचिरोली, शंकरपूर आदी ठिकाणच्या फिरत्या पशुचिकित्सालयातील पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. जिल्ह्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांचे एकूण १०८ पदे रिक्त आहेत. यापैकी ४७ पदे भरण्यात आली असून ६१ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील विविध पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत पशुधन पर्यवेक्षक वर्ग ३ चे ११ पदे व वर्ग ४ मधील पशुपट्टीबंधकाचे ८ पदे रिक्त आहेत. पशुपट्टी बंधकाचे ८ रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही जि.प. पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू आहे. पशुधन पर्यवेक्षकाचे ११ पदे सरळसेवेने भरावयाचे आहेत. पशुधन विकास अधिकाऱ्यांचे गेल्या चार-पाच वर्षांपासून तब्बल ६१ पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर आजारी गुरांवर औषधोपचार करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
रिक्त पदांमुळे पशु वैद्यकीय सेवा प्रभावित
By admin | Published: November 01, 2014 12:52 AM