देवाजी तोफा यांचे प्रतिपादन : कारवाफात युवकांना मार्गादर्शन धानोरा : लोकशाहीची खरी सुरूवात ग्रामसभेपासून होते. गावातील ग्रामसभा सक्षम झाली. तरच विकासाची दालने खुली होतील. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ग्रामसभा सक्षम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी केले. धानोरा तालुक्यातील कारवाफा येथे पोलीस विभागाच्या वतीने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर अॅक्सीस बँकेचे व्यवस्थापक प्रकाश ठाकरे, पत्रकार आनंद आंबेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस उपनिरिक्षक करूणा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाश ठाकरे यांनी कॅशलेस बँकींग मुळे होणारे फायदे, त्याचे महत्त्व, वापरण्याची पध्दत आदीबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. मुक्तीपथ संस्थेतर्फे व्यसनमुक्तीवर नाटक व गीत सादर करण्यात आले. प्रास्ताविक एसडीपीओ गणेश इंगळे, संचालन पोलीस उपनिरिक्षक शशिकांत लोंढे तर आभार विक्रम चव्हाण यांनी मानले. यशस्वीतेसाठी पोलिसांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
विकासासाठी ग्रामसभा सक्षम करा
By admin | Published: January 06, 2017 1:31 AM