संजय तिपाले/ गडचिरोली: छत्तीसगडमधील अबुझमाड जंगलात दहा नक्षल्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना ३० एप्रिल रोजी दुपारी यश आले. गडचिरोलीपासून १५ ते २० किलोमीटर अंतरावरील नारायणपूरच्या कांकेर सीमावर्ती भागात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली.
छत्तीगडमधील नारायणपूर पोलिस नक्षलविरोधी अभियान राबवित होते. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी देखील गोळीबार केला. यात १० नक्षलवादी ठार झाले. बस्तरचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांच्या माहितीनुसार, घटनास्थळाहून आठ नक्षल्यांचे मृतदेह सापडले आहेत. यात तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. घटनास्थळी एके ४७ सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात हाय अलर्ट महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. सीमावर्ती भागांमध्ये नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले असून यंत्रणा सजग झाली आहे. अद्याप ओळख पटली नाही या घटनेतील मयत नक्षलवाद्यांची ओळख पटविण्यात अद्याप सुरक्षा यंत्रणेला यश आले नाही. यातील काही नक्षलवादी हे गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित असल्याचा संशय आहे. अबुझमाड जंगलातील नक्षल कारवाईत या सर्वांचा सहभाग असू शकतो असा छत्तीसगड पोलिसांचा कयास आहे.