करारनाम्याचा भंग : देसाईगंज नगर परिषदेचे होत आहे दुर्लक्ष; वाहतुकीस अडथळादेसाईगंज : नगर परिषदेचा शॉपींग कॉम्प्लेक्स अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून या अतिक्रमणामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून पालिका प्रशासनाच्या या उदासीन धोरणाबाबत नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. देसाईगंज येथील नझुल खसरा क्रमांक २२/८०/१ मध्ये देसाईगंज नगर परिषदेच्या विकास योजनेंतर्गत बाजार विभागात आरक्षण क्रमांक पाच वरील जागेवर नगर विकास योजनेतून दुकानांचे गाळे बांधण्यात आले. हे गाळे दुकानदारांनी भाडे तत्वावर घेऊन दुकाने सुरू केली आहेत. मात्र दुकानांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरला जातो. अधिकचे सामान दुकानाच्या बाहेर ठेवले जाते. एका दुकानदाराने सामान बाहेर ठेवले म्हणून आपले दुकान दिसत नाही. म्हणून दुसरा दुकानदार आणखी समोर आणून सामान ठेवत आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या दुकानदारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नगर परिषदेची असली तरी नगर परिषद कोणती कारवाई करीत नसल्याने अतिक्रमणाचा विस्तार होत चालला आहे व ही समस्या गंभीर होत चालली आहे. शॉपींग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून नगर परिषदेला उत्पन्न मिळत असल्याने गाळेधारकांना सोयीसुविधा पुरविणे ही नगर परिषदेची जबाबदारी आहे. मात्र या ठिकाणी शौचालय, मूत्रीघर नाही. शॉपींग कॉम्प्लेक्सची सफाई केली जात नाही. त्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे. सदर गाळे गोदाम, वर्कशॉप म्हणून तसेच स्फोटक पदार्थ ठेवण्यासाठी नियमाने वापरता येत नसले तरी काही गाळेधारक गोदाम म्हणून याचा वापर करीत आहेत. याकडेही नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)
शॉपिंग कॉम्प्लेक्सला अतिक्रमणाचा विळखा
By admin | Published: March 18, 2016 1:26 AM