लाेकमत न्यूज नेटवर्कजाेगीसाखरा, आरमाेरी : आरमाेरी तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रातील शंकरनगर जंगल परिसरात करण्यात आलेले वनजमिनीवरील अतिक्रमण वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी काढले. दरम्यान यावेळी जेसीबीने जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले.
आरमाेरी वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील जाेगीसाखरा नियत क्षेत्रात राखीव वन कक्ष क्रमांक ४७ मध्ये वनजमिनीवर शंकरनगर येथील रहिवासी रंजित मंडल यांनी अतिक्रमण केले हाेते. ०.२० हेक्टर आर. क्षेत्रात देवेंद्र मंडल यांचे अतिक्रमण हाेते. ०.४० हेक्टर आर. क्षेत्रात किरण मंडल यांचे तसेच गाेरगरीब यांचे एक हेक्टर क्षेत्रात अतिक्रमण हाेते. तिघांचे मिळून एकूण एकूण २.८ हेक्टर आर क्षेत्राच्या वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.
आरमाेरीचे वनपरिक्षेत्राधिकारी सचिन डाेंगरवार यांच्या नेतृत्वात अतिक्रमण हटविण्याची कारवाई वनपरिमंडळ अधिकारी एम.गाजी शेख, वनरक्षक प्रिया करकाडे, सपना वालदे, रूपा सहारे, विजय जनबंधू, दिगांबर गेडाम यांच्यासह वनमजुरांनी केली.
याप्रसंगी शंकरनगरचे माजी सरपंच सुजीत मिस्त्री, माजी सरपंच सुबाेध सरदार, विष्णू गाईन, उत्तम जयदेव, विष्णूपद गाईन, क्रिष्णापद सुदाम राॅय यांच्यासह नागरिक व अतिक्रमणधारक उपस्थित हाेते.