धानोरा : येथील किसान भवनाच्या मागे असलेले अतिक्रमण पोलिसांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास वनकर्मचाऱ्यांनी हटविले आहे. येथील आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या सर्व्हे क्रमांक ७४ मधील कक्ष क्रमांक ५२० मधील वनविभागाच्या जागेवर काही नागरिकांनी अवैध अतिक्रमण करून जागा हडपण्याचा प्रयत्न चालविला होता. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावातील काही सुज्ञ नागरिकांनी याबाबतची तक्रार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे केली. त्यानुसार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने या जागेवरील अतिक्रमण हटविले. अतिक्रमण हटवितेवेळी वनपरिक्षेत्राधिकारी निकम, क्षेत्रसहाय्यक चहांदे, बगमारे, ढोरे, वनरक्षक ज्ञानेश कायते, कोडाप, भसारकर, सोनटक्के, दिघे, गायधने, गेडाम, ढवळे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक थोरबोले व धानोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. इतरही गावांमध्ये वनजमिनीवर अतिक्रमण करून नागरिकांनी झोपड्या बांधल्या आहेत. तर काहींनी शेतजमिनीसाठी जागा तयार केली आहे. त्यांच्यावरही कारवाईची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले
By admin | Published: November 18, 2014 10:55 PM