गडचिरोली : कृषी महाविद्यालय, आयटीआय, विश्रामगृह आदी कार्यालयांच्या समोर मुख्य मार्गाच्या बाजूला काही नागरिकांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. अतिक्रमणासाठी बाजूची नाली बुजविली जात आहे. परिणामी पावसाचे पाणी वाहून जाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सदर अतिक्रमण आताच हटवावे, अशी मागणी होत आहे.
रस्त्याची दुरवस्था कायम
गडचिरोली : तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या मारकबोडी ते डोंगरगाव मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून ये-जा करणा-यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर मार्गाची दुरुस्ती करावी.
वडधा बायपास मार्गाचे बांधकाम करा
आरमोरी : मुख्य रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केले. मात्र अनेक वर्षांपासून बायपास मार्गाची दुरुस्ती रखडली आहे. वडधा हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. १९८५ साली या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र २५ वर्षांचा कालावधी उलटूनही मार्गाचे बांधकाम झाले नाही.
बालकांमध्ये वाढतेय चायनिजचे आकर्षण
देसाईगंज: शहरातील चारही मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी चायनिजचे हातठेले सुरू करण्यात आले आहेत. शाळकरी विद्यार्थी व महाविद्यालयीन युवक, युवती चायनिज पदार्थ खात असल्याचे दिसून येते. चायनिज पदार्थामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणामही होत आहे.
पीएचसीला दर्जा मिळेना
कुरखेडा : मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी आहे. सातत्याने मागणी करूनही विद्यमान सरकारचे रुग्णालय बनविण्याकडे दुर्लक्ष हाेत आहे.
बच्चे कंपनी बेशिस्त
गडचिरोली : शहरात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन वाहनधारकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र याकडे उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. वर्दळ असलेल्या मार्गावरून बच्चे कंपनीच्या ड्रायव्हिंगमुळे अपघाताची शक्यता आहे. कारवाईची मागणी हाेत आहे.
विद्युत खांबाची प्रतीक्षा
धानोरा : तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाढीव विद्युत खांब लावून वीज पुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
नाल्यांचा उपसा नाही
गडचिरोली : सर्वोदय व गांधी वाॅर्डातील संपूर्ण सांडपाणी आरमोरी मार्गावरील नाल्यांमधून वाहते. मात्र या नाल्यांचा नियमितपणे उपसा केला जात नाही. परिणामी सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. सदर नाल्या उपसण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नियाेजन ढासळल्यामुळे गाळ साचून आहे.
कार्यालयात अस्वच्छता
गडचिरोली : शहरातील अनेक कार्यालयाच्या इमारतींच्या परिसरात सर्वत्र अस्वच्छता आहे़ मागच्या बाजूने कच्चा रस्ता असून त्यावर घाण, कचरा साठून असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तालुकास्तरावरील अनेक कार्यालय परिसरात कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. स्वच्छतेकडे कानाडाेळा आहे.
गरोदर माता उपेक्षितच
सिरोंचा : जिल्ह्यातील मातांना बुडीत मजुरी देण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. महिला दवाखान्यामध्ये चकरा मारत आहेत. सदर मजुरी तत्काळ देण्याची मागणी होत आहे. काही महिलांना एक ते दीड वर्षापासून बुडीत मजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे महिला अद्यापही वंचित आहेत. प्रशासनाकडून दिरंगाई हाेत आहे.
उद्योग निर्मितीची मागणी
गडचिरोली : छत्तीसगड, आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या चार तालुक्यातील औद्योगिक विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात गडचिरोली जिल्ह्यात एकही मोठे उद्योग निर्माण न झाल्याने बेरोजगारी वाढली आहे.
कैकाडी वस्ती दुर्लक्षित
गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाज बांधवांची वस्ती आहे. या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. मात्र येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. कैकाडी वस्तीतील नागरिक प्रत्येक निवडणुकीत मतदान करतात. मात्र त्यांना नागरी सुविधा मिळत नाही.
पेंढरीत गॅस एजन्सी द्या
धानोरा : वन विभागामार्फत संयुक्त वन व्यवस्थापनचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. पेंढरी परिसरातील जवळपास ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहेत. मात्र गॅस एजन्सी केवळ धानोरा येथेच आहे. पेंढरी हे परिसरातील मोठे गाव आहे. या गावात गॅस एजन्सीची गरज आहे.
स्तनदा माता वंचित
आलापल्ली : शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होते.
याेजनांबाबत अनभिज्ञता
कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे. तालुकास्तरावर याेजना जनजागृती केंद्र निर्माण केल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ मिळू शकताे.
डिझेलसाठी अनुदान द्या
धानोरा : शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी डिझेलवर चालणारे इंजिन अनुदानावर वाटप करण्यात आले. मात्र पेट्रोलभाव गगनाला भिडले असल्याने शेतकऱ्यांना या इंजिनचा वापर करताना अडचण निर्माण होत आहे. दाेनही हंगामात अनेक शेतकरी डिझेल इंजीनचा वापर करून पिकांना पाणी देतात.