अहेरी : शहरातील बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी येणारे ग्राहकही रस्त्याच्या बाजूलाच दुचाकी वाहने पार्किंग करतात. त्यामुळेही रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
अनेक भूखंड रिकामे
गडचिरोली : शहराजवळची शेकडो एकर जागा आहे. एमआयडीसीसाठी राखीव करण्यात आली आहे. या परिसरात पाणी, वीज यासारख्या सुविधाही राज्य शासनाच्यावतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र बहुतांश भूखंड रिकामेच आहेत. तेे रिकामे भूखंड संबंधितांकडून परत घेऊन दुसऱ्यांना देण्याची गरज आहे.
तंमुसला प्रशिक्षण देण्याची मागणी
रांगी : अनेक गावांमध्ये तंटामुक्त समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. गावात भांडण, तंटे वाढत आहेत. मात्र समित्या तंटे मिटविण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे तंटामुक्त समित्यांना दरवर्षी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. प्रशिक्षण दिल्यास भांडण व तंटे साेडविण्यास मदत हाेईल.
राजनगरी अहेरीत घाणीचे साम्राज्य
अहेरी : स्थानिक नगर पंचायत स्वच्छतेबाबत फारशी आग्रही नाही. अनेक ठिकाणी नाल्यांचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसून येत आहे. अहेरी नगरपंचायतीची स्थापना २३ एप्रिल २०१५ रोजी झाली. मात्र अद्यापही समस्या सुटल्या नाहीत.
खताच्या ढिगाऱ्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले
गडचिरोली : तालुक्याच्या अनेक गावांमध्ये रस्त्याकडेला शेणखताचे ढिगारे आहेत. या ढिगाऱ्यांमुळे वादळवारा आल्यास तो रस्त्यावर येतो व तेथील काडीकचरा पादचारी तसेच वाहनधारकांच्या डोळ्यात जातो. यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष हाेत आहे.
टाकीची सुरक्षा वाऱ्यावर
आरमोरी : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याची टाकी सुरक्षित करण्याची गरज आहे.
खुटगावात निवारा बांधा
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे येथे नवीन प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पार्किंगची समस्या भारी
देसाईगंज : मुख्य रहदारीच्या आरमोरी-कुरखेडा मार्गावर वाहनचालक वाटेल तेथे चारचाकी, दुचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे येथील रहदारीस अडथळा होत आहे. शिवाय त्याचा व्यापाऱ्यांसोबतच ग्राहकांनाही फार त्रास होत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणधारक व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मोकाट जनावरांचा हैदोस
गडचिरोली : दर रविवारी शहरात भरणाऱ्या बाजारात मोकाट गुरांचा हैदोस असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या बाजारात खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. विक्रेत्यांनी ठेवलेल्या भाजीवरही त्यांची नजर चुकवून ताव मारतात. माेकाट जनावरांचा नगरपालिका प्रशासनाने बंदाेबस्त करावा, अशी मागणी आहे.
उद्याेग उभारण्याची मागणी
भामरागड : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या भामरागड तालुक्यात उद्याेगधंदे नसल्याने युवकांना बाहेरगावी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे बेराेजगार युवक बाहेर स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे उद्याेग उभारावेत, अशी मागणी आहे.
कचऱ्याचे व्यवस्थापन करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात. येथे अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे राेगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने लक्ष घालून कचऱ्याचे व्यवस्थापन करावे.
निवाऱ्यावर शेडचा अभाव
जाेगीसाखरा : तालुक्यातील काही गावांमध्ये प्रवासी निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. राज्य परिवहन मंडळाने गावागावात पाहणी करून निवारा शेड उभारावे, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, पावसाळा तसेच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वाकडी-बोरी मार्गावर खड्डे
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाकडी-लखमापूर बोरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून, या रस्त्यांची अवस्था बकाल झाली आहे. वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष आहे.
सावरगाव परिसर दुर्लक्षित
धानोरा : छत्तीसगड व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सावरगाव परिसरातील गावांचा विकास रखडला आहे. हा परिसर आदिवासीबहुल व नक्षल प्रभावित आहे. या ठिकाणी नेमण्यात आलेले कर्मचारी नियमित कर्तव्य बजावत नाहीत. अनेक नागरिकांना शासकीय योजनांची माहिती नाही.
जीर्ण खांब बदला
देसाईगंज : नगर परिषद क्षेत्रात अनेक लोखंडी खांब वाकले आहेत. काही खांब खालच्या बाजूने जीर्ण झाले आहेत. ते खांब कधीही कोसळण्याचा धोका आहे. ते खांब बदलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. परंतु या मागणीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र राेष व्यक्त हाेत आहे.
डुकरांचा बंदाेबस्त करा
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा धुमाकूळ प्रचंड वाढला आहे. मात्र, पालिकेच्यावतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडावली असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाने डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.