सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. स्थानिक प्रशासन कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित ठेवण्यात व्यस्त आहे. याचाच गैरफायदा घेत आठवडी बाजारातील अतिक्रमणधारकांनी अतिक्रमित जागेवर अनधिकृत पक्के बांधकाम करण्याचा सपाटा चालविला आहे. ज्या ठिकाणी अनधिकृत पक्के बांधकाम सुरू केले आहे, ती जागा देसाईगंज शहराच्या आठवडी बाजारासाठी नगरविकास आराखड्यात आरक्षण क्रमांक ३२ म्हणून आरक्षित करण्यात आली आहे. अतिक्रमण केल्याचे नगर परिषद कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. अवैद्यरीत्या केलेले अतिक्रमण सदरचे नोटीस प्राप्त झाल्याच्या तीन दिवसाच्या आत स्वखर्चाने काढून टाकावे, अन्यथा महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्याेगिक नगर अधिनियम १९६५चे कलम १७९ अन्वये कार्यवाही करून नगर परिषद यंत्रणेद्वारे अतिक्रमण काढण्यात येईल. यासाठी येणारा खर्च अतिक्रमणधारकांकडून सक्तीने वसूल करण्यात येईल, अशी नोटीसद्वारे बजावण्यात आले आहे. ही नाेटीस १९ मे राेजी बजावण्यात आली आहे. नोटीस बजावून दहा दिवसांचा कालावधी उलटूनही अतिक्रमण अद्यापही काढण्यात आलेले नाही. त्यामुळे अतिक्रमण काढणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाजार संकुल प्रस्ताव थंडबस्त्यात
देसाईगंज शहर नगरविकास आराखड्यात आठवडी बाजाराकरिता आरक्षण क्रमांक ३२ या आरक्षित जागेवर एकात्मिक शहर विकास अंतर्गत ७५ गाळे बांधकामासाठी ६३ लाख १४ हजार ३२० रुपये बाजार संकुल बांधकामासाठी मंजूर झाले होते; परंतु या ठिकाणी सभोवताल मोठ्या प्रमाणात अनधिकृत अतिक्रमण असल्याने बाजार संकुल प्रस्ताव अद्यापही प्रलंबितच आहे.