आरमाेरी : शहरातील विविध भागात घरांचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. बांधकाम साहित्य हटविण्याची मागणी होत आहे. या साहित्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
वैयक्तिक शौचालयांची गावात कमतरता
अहेरी : अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली आदी दुर्गम तालुक्यांतील अनेक गावांमध्ये वैयक्तिक शौचालये फारच कमी प्रमाणात आहेत. जिल्ह्यात १०० टक्के शौचालय असणारे एकही गाव नाही. यामुळे गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे आजारात वाढ होत आहे. ग्रामीण नागरिक मुख्य रस्त्यावरच शौचास बसतात.
खुल्या जागा ठरताहेत कुचकामी
देसाईगंज : नगरपालिका क्षेत्रात अनेक वाॅर्डांमध्ये ओपन स्पेस आहेत. मात्र, काही मोजक्याच ओपन स्पेसला संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या ओपन स्पेसला संरक्षक भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. न.प.ने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करण्याची मागणी आहे.
रामगड परिसरात फवारणी करा
कुरखेडा : रामगड-पुराडा भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, या भागात तत्काळ डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यंदाच्या पावसाळ्यातही फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. नियमित फवारणीकरिता वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
अनेक गावांंसाठी लाईनमनच नाही
आरमोरी : तालुक्यातील अनेक गावांत सुरळीत विद्युतपुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते; परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युतपुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे लाईनमन द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मध संकलनातून राेजगार निर्मिती शक्य
कमलापूर : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मध संकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
घाण पाण्याच्या गटारीने डास वाढले
गडचिरोली : स्थानिक नगरपालिका क्षेत्रात विविध वॉर्डांत मोकळ्या भूखंडावरून घाण पाण्याचे डबके, तसेच गटारे निर्माण झाली आहेत. या डबक्यांच्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. परिणामी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील कन्नमवार वॉर्डात अशा प्रकारची घाण पाण्याची गटारे अनेक ठिकाणी आहेत.
परवाना शिबिराचे आयोजन करावे
काेरची : तालुक्यात दिवसेंदिवस वाहनधारकांची संख्या वाढत आहे. मात्र, अनेकांजवळ वाहन चालविण्याचा परवाना नाही. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने तालुक्याच्या ठिकाणी ठराविक दिवशी शिबिर आयोजित केले जाते. मात्र, कोरोनामुळे अशा शिबिरांचे आयोजन बंद केले आहे. आता काेराेना संसर्गाची लाट आटाेक्यात आल्यामुळे प्रशासनाने तालुकास्तरावर परवाना शिबिर घेतल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळेल.