गडचिरोली: दुर्गम, आदिवासीबहुल भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नक्षलवाद हा अडसर ठरत आहे. त्यामुळे या भागाच्या संपूर्ण विकासासाठी नक्षलवाद संपवणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस दल सक्षम आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मंगळवारी, २५ तारखेला भामरागड तालुक्यातील नक्षलग्रस्त आणि दुर्गम अशा धोडराज पोलीस मदत केंद्राच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आणि जनजागरण मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी करीत त्यांना भेटवस्तू आणि फराळाचे वाटप केले. कार्यक्रमाला पोलीस महासंचालक रजनीश सेठ, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल, बाळासाहेबांची शिवसेनाचे विदर्भ समन्वयक किरण पांडव आदी उपस्थित होते.
नागपूर येथून हेलिकॉप्टरने धोडराज येथे दाखल झाल्यानंतर पोलीस मदत केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, यापूर्वी पालकमंत्री असतानासुद्धा गडचिरोलीच्या दुर्गम भागात मी भेटी दिल्या. विकासाची कामे आता गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात होत आहेत. रस्ते, पाणी, शिक्षण, वैद्यकीय सुविधा आदी मूलभूत सुविधांची निर्मिती करून हा भाग मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे.
प्रास्ताविक पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी, संचालन विनीत पद्मावार यांनी केले. आभार पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी मानले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलीस जवान तसेच त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली.
आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी प्रयत्नशील
हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. पोलीस महत्त्वाचा घटक आहे. पोलिसांच्या पाठीमागे महाराष्ट्र शासन भक्कमपणे उभे आहे. तसेच आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गडचिरोलीत विविध योजना, नवीन उद्योग, लोकांच्या हाताला काम याबाबत सरकारने नियोजन केले आहे. पूर्वीचे गडचिरोली आणि आताचे गडचिरोली यात आमूलाग्र बदल झालेला दिसत आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
पोलिसांमुळे योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यास मदत
यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ म्हणाले की, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर येऊन जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी येथे दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला, ही बाब संपूर्ण पोलीस जवानांसाठी अतिशय आनंदाची आहे. सरकारच्या पाठिंब्यामुळेच गडचिरोली पोलीस उत्कृष्ट काम करीत आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात मदत होत आहे.