वैभव माळी यांचे आवाहन : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठकगडचिरोली : गणेश, शारदा, दुर्गा व बकरी ईद उत्सवाच्या परिसरात दारू, जुगार, सट्टापट्टी चालणार नाही, याची संपूर्ण काळजी घ्या, उत्सवादरम्यान शांतता ठेवण्याची जबाबदारी संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची आहे. नियम व मर्यादा सांभाळून उत्सवाचा आनंद घ्या, असे आवाहन गडचिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव माळी यांनी केले.गडचिरोली पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी सभागृहात उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक अनंत कांबळे, नगर पालिकेचे कर्मचारी बी. एम. शेंडे, मो. मुस्तफा शेख, हबीब पठाण, गडचिरोलीचे पोलीस पाटील अनिल खेवले, रफीक कुरेशी आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांशी चर्चा केली. पुढे बोलताना वैभव माळी म्हणाले, उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सवादरम्यान दारू पिऊन धिंगाना घालू नये, उत्सवाच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंतची सर्व जबाबदारी मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी योग्यरित्या पार पाडावी, विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान दोन गणेश व इतर उत्सव मंडळ एकत्र येऊ नये, तसेच एकाच ठिकाणी प्रदीर्घ वेळ मिरवणूक ठेवू नये, यातून शांतता धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या सर्व बाबींची काळजी घ्यावी, असेही माळी म्हणाले. यावेळी वैभव माळी यांनी उपस्थित गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना उत्सव, लाऊडस्पिकर, डीजे यांची रितसर परवानगी घेतली आहे काय, महावितरणकडून स्वतंत्र वीज जोडणी घेतली आहे काय, याबाबत विचारणा केली. यावेळी शहरी व ग्रामीण मिळून ६० मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)उत्सवादरम्यान डीजे व लाऊडस्पीकरवर कंट्रोलसर्वोच्च न्यायालयाच्या २००६ च्या निर्णयानुसार डीजे वाद्याच्या आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या मर्यादेबाबत सक्त आदेश आपल्याला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे उत्सवाच्या विसर्जनदरम्यानच्या मिरवणुकीत डीजे वाद्याची मर्यादा सांभाळावी, तसेच विसर्जन काळातील तीन दिवस रात्री १२ पर्यंत मिरवणूक काढता येईल, डीजे वाद्याची मर्यादा न पाळल्यास संबंधित मंडळांच्या पदाधिकारी व सदस्यांवर पोलीस विभागातर्फे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वैभव माळी यांनी यावेळी दिला. उत्सवादरम्यान रोज रात्री १० वाजेपर्यंत लाऊडस्पिकर मर्यादित आवाजात सुरू ठेवता येणार आहे. मर्यादेनंतर लाऊडस्पिकर सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असेही माळी यांनी यावेळी स्पष्ट केले. यंदाच्या उत्सवात नियमाचे काटेकोर पालन होण्याचे संकेत त्यांनी दिले. आरमोरी ठाण्यातही शांतता समितीची बैठकआरमोरी पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवारी शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी सण व उत्सवाच्या काळात शांतता प्रस्थापित करणे ही सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. प्रत्येकाने एकमेकांच्या धर्माविषयी आपुलकीची भावना ठेवावी, जेणेकरून कुठेही समाजविघातक कार्य होणार नाही, असे सांगितले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शहीद संघटनेचे अध्यक्ष हेमलता वाघाडे, जि. प. सदस्य लक्ष्मी मने, वेणू ढवगाये, चंदू बेहरे, माजी पं. स. सभापती शालिकराम गरमळे, इमरानअली सय्यद, सारिका कांबळे, दिवाकर पोटफोडे, गणेश वणवे, देवेंद्र सोनकुसरे, पंकज नाकाडे, भूषण सातव, शैलेश चिटमलवार, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब नरवटे, नारायण बच्छलवार, पंकज दाभाळे, मिलिंद खोब्रागडे आदी उपस्थित होते.
मर्यादा पाळून उत्सवाचा आनंद घ्या
By admin | Published: September 16, 2015 2:03 AM