गडचिराेली : स्थानिक गाेकुलनगर देवापूर रिठ सर्वे नं. ७८ मधील तलावाच्या जागेत अतिक्रमण करून झाेपड्या बांधण्यात आल्या हाेत्या. या झाेपड्या प्रशासनाने सात ते आठ दिवसांपूर्वी पाडल्या. त्यानंतर पुन्हा येथे अतिक्रमण हटाव माेहीम सुरू करून तलावाचे खाेलीकरण व पाळ निर्मितीचे काम सुरू करण्यात आले. आम्हाला कुठेही जागा नाही, त्यामुळे आम्ही कुठे जाणार, असे म्हणत गाेरगरीब, बेघर असलेल्या अतिक्रमणधारकांनी पुन्हा रविवारी रात्री येथे झाेपड्या उभ्या केल्या. दरम्यान याची कुणकुण लागताच प्रशासनाने अतिक्रमण हटाव माेहीम सुरू केली. काही वेळातच संतप्त झालेल्या अतिक्रमणधारकांनी पुन्हा साेमवारी भर दुपारी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तेथे निवेदन दिले.
प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी निवेदन स्वीकारून याबाबत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे व गडचिराेली तालुकाध्यक्ष बाशीद शेख यांच्या नेतृृत्वात निघालेल्या या माेर्चात झाेपडपट्टी अतिक्रमणधारक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. सदर अतिक्रमण हटाव माेहीम सध्या थांबविण्यात यावी. अतिक्रमणधारकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी. त्यानंतर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून अतिक्रमणधारकांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गाेरगरीब नागरिक व महिला सदर तलावात अतिक्रमण करून झाेपड्या बांधून वास्तव्य करीत हाेते. मात्र नगर पालिका प्रशासनाकडून गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सातत्याने सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. दरम्यान आता आम्ही बेघर अतिक्रमणधारक जायचे कुठे? असा सवाल त्यांनी केला आहे. झाेपड्यांमध्ये संसाराेपयाेगी साहित्य हाेते. मात्र ते कारवाईमुळे नेस्तनाबूत करण्यात आले. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
लेआउटधारकांनी जागा बळकावली?
सर्वे नं. ७८ मधील तलावाची एकूण जागा ३.७६ हेक्टर इतकी असून त्याची ‘क’शीटवर आहे. मात्र आता प्रत्यक्षात तेवढी जागा शिल्लक नाही. लगतच्या दाेन ते तीन लेआउटधारकांनी या तलावाची जागा अतिक्रमण करून बळकावली, असा आराेपही अतिक्रमणधारकांनी केला आहे. आम्हा गरिबांच्या झाेपड्या अतिक्रमणात पाहावत नाही. मात्र श्रीमंत असलेल्या लेआउटधारकांचे याच तलावातील अतिक्रमण प्रशासनाला कसे काय चालते? असा सवालही अतिक्रमणधारकांनी केला आहे.
सदर तलाव नगरपरिषदेला हस्तांतरित झाला आहे. त्यामुळे येथे खाेलीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. खाेलीकरणामुळे भूगर्भाची पाणीपातळी वाढणार असून परिसरातील कुटुंबांना साेयीस्कर हाेईल. खाेलीकरणामुळे आताच तिथे पाणी दिसत आहे. पावसाळ्यातील आपत्तीच्या दृष्टिकाेनातून तलावात घर बांधणे धाेक्याचे आहे.
- सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी, न. प. गडचिराेली.
नगरपरिषद प्रशासनाने दुजाभाव करून सूडबुद्धीने गरिबांच्या झाेपड्या पाडल्या. अतिक्रमण हटाव माेहीम राबवून येथील झाेपड्या नेस्तनाबूत केल्या. प्रशासनाने आधी अतिक्रमणधारकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू द्यावी. त्यानंतरच कारवाई करावी. ताेपर्यंत ही कारवाई थांबवावी.
- बाळू टेंभुर्णे, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी