झाडीपट्टी रंगभूमी विस्तारली : यंदा प्रथमच महामंडळाची स्थापनाप्रदीप बोडणे वैरागडझाडीपट्टी रंगभूूमीवर यंदा अनेक नव्या नाट्य मंडळांनी एन्ट्री केली असून जुने व नवे सारेच मंडळ लोककलेतून रसिकांचे प्रबोधन व मनोरंजन करण्यासाठी तयार झाले आहेत. झाडीपट्टी रंगभूमीतील कलाकारांच्या सन्मानासाठी व आचारसंहितेसाठी यंदा प्रथमच अखील झाडीपट्टी नाट्य महामंडळ देसाईगंजची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाशी संलग्नीत सर्व नाट्य मंडळाच्या कलाकारांना नियमांचे पालन करावे लागणार आहे.झाडीत जन्माला आली म्हणूून झाडीपट्टीची रंगभूमी. भारूड, लावणी, तमाशा, दंडार या लोककला प्रकारातून जन्माला आलेली रंगभूमी पुढे बहरत गेली. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज) हे आता झाडीपट्टी रंगभूमीचे केंद्र बनले असून तब्बल ४० नाट्य मंडळे यंदा नाट्य प्रयोग सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दीपावलीनंतर दिवसा मंडई व रात्री मनोरंजनासाठी नाटकांची पर्वणी सुरू होणार आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नाट्य रसिक आहेत. स्वत:ची पदरमोड करून येथील रसिकांनी नाट्यप्रयोगाचा आस्वाद घेण्याचे वेड कायम जोपासले आहे. नाट्यप्रयोगाची तारीख निश्चित करण्यासाठी विविध गावातील आयोजक मंडळी वडसा शहर गाठत आहेत. अनेक मंडळांनी झाडीपट्टी नाट्यप्रयोगाची तारीख निश्चित केली आहे. पूर्वी बोटावर मोजण्याइतकी नाट्य मंडळे होती. सद्य:स्थितीत वडसा येथील झाडीपट्टी रंगभूमी केंद्रात ४० नाट्य मंडळे तयार झाले आहेत. आपल्या मंडळाकडून नाट्यप्रयोग देण्यासाठी वडसा येथे आपले कार्यालय उघडून बसले आहेत. आपली कला नाट्य रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी संगीतसाथ, रंग व वेशभूषा, ध्वनी व प्रकाश या सर्वांच्या माध्यमातून झाडीपट्टीची रंगभूमी एक हजार लोकांना रोजगार देत आहे. हिरव्याकंच झाडीतून या रंगभूमीने स्वत:ची स्वतंत्र वाट निर्माण केली. येथील जुन्या, जाणत्या अभिनय संपन्न नाट्यकर्मीने ऐतिहासिक, सामाजिक, संगीत, नाटकाच्या माध्यमातून रसिक मनावर राज्य केले. मात्र रंगभूमीची ही दिमाखदार वाट शहरीकरणाच्या महामार्गाला जोडल्यानंतर येथील हौशी रंगभूमीची व्यावसायिक रंगभूमी झाली. पुणे, मुंबईच्या कलाकारांचा ओढा या रंगभूमीवर वाढला आहे तर दुसरीकडे मातीतल्या कलाकारांना आपल्या अंगी असलेला अभिनय सादर करण्याची संधी न मिळाल्याने अलिकडे अस्सल झाडीचे कलाकार तयार झाले नाही.या रंगभूमीत प्रवेश करणाऱ्या नाट्य मंडळांनी येथील कलाकारांना संधी देऊन सदर रंगभूमीला जुने वैभव प्राप्त करून द्यावे, अशी नाट्य रसिकांची इच्छा आहे.महामंडळात १४ जणांचा सहभागझाडीपट्टीच्या नाट्य कलाकारांची आचारसंहिता ठरविण्याकरिता अखिल झाडीपट्टी नाट्य महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाच्या अध्यक्षपदी यशवंत ढोरे तर सचिवपदी प्रल्हाद मेश्राम, कोषाध्यक्षपदी नित्यानंद बुद्धे यांची निवड करण्यात आली आहे. या महामंडळात जयप्रकाश बावनथडे, हिरालाल सहारे, किरपाल सयाम, नितीन नाकाडे, वासुकुमार मेश्राम, अशोक दुधकुवर, चेतन वडगाये, संजीव रामटेके, मुकेश गेडाम, श्यामराव खुणे, प्रदीप उके, प्रमोद नेवारे, सुशील कोडापे आदींसह एकूण १४ जणांचा समावेश आहे.
नव्या नाट्य मंडळांची एन्ट्री
By admin | Published: October 20, 2016 2:37 AM