गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फ त कोरची येथील पंचायत समिती कार्यालयात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या अवजारांचे वितरण नुकतेच करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना दुबार पीक व कृषी विभागाच्या अनेक योजनांविषयी माहिती देण्यात आली.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध शाळा समितीचे सभापती अतुल गण्यारपवार, जिल्हा परिषद सदस्य पद्माकर मानकर, सुनंदा आतला, कोरची पंचायत समितीचे सभापती शालिनी आंदे, उपसभापती गोविंदराव दरवडे, व्ही. जे. महाजन, गजभिये, संवर्ग विकास अधिकारी भगत, बालविकास प्रकल्प अधिकारी सजनपवार, उपअभियंता दमाहे, तालुका कृ षी अधिकारी फुलझेले, पशुधन विकास अधिकारी डॉ. कुमरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, राजेश नैताम, रामदास हारामी आदी उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न केल्याने जिल्ह्यातील शेतकरी शेती उत्पन्नात व इतर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या तुलनेत मागे पडलेला असल्याने शेतकऱ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या मागणीतून विविध यंत्राचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विविध यंत्राचा वापर कशाप्रकारे करायचा याबाबत कृषी विभागामार्फ त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्याक्षिक करून दाखविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंत्राचा वापर करावा, असे आवाहन अतुल गण्यारपवार यांनी केले. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या मागणीवर विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कृषी विभागाच्यावतीने मानव मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ३७ शेतकरी गटांना भात रोवणी यंत्र, पॉवर ट्रीलर, भात कापणी यंत्र, कोनरिडर, युरीया ब्रिकेट अप्लीके टर, स्पे्रअर, डस्टर आदी यंत्राचा पुरवठा करण्यात येत आहे. कोरची तालुका हा निसर्गरम्य असून येथील बहुतांश जमीन सुपिक आहे. त्यामुळे शेतीतून अधिकाअधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दुबार पीक घेणे आवश्यक आहे. चना, मका, लाखोडी, मोहरी यासह अन्य पिकांचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ज्या शेतकऱ्यांकडे विहिर आहे अशा शेतकऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक मोटार, इंजिनचा वापर करून बारमाही पीक घेऊन आर्थिक उन्नती करावी, आवश्यक असलेल्या यंत्राची मागणी त्यांनी कृषी विभागाकडे करावी, असे आवाहन करण्यात आले.
कोरचीत शेतकऱ्यांना अवजारांचे वाटप
By admin | Published: June 14, 2014 11:35 PM