अहेरी : तालुक्यातील राजपूर पॅच येथे १७ मार्च रोजी सरपंच मीना वेलादी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करून ‘मादक द्रव्य नियंत्रण समिती’ स्थापन करण्यात आली. गावात अवैध दारूनिर्मिती व विक्री मोठ्या प्रमाणात होत असून, या समितीच्या माध्यमातून अवैध व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.
बैठकीत ग्रामसभेने स्वत: तेंदूपत्ता संकलन व विक्री करण्याचा निर्णय घेतला. साधन संपत्ती नियोजन व व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी गठित करण्यात आली. सोबतच गावात वाढलेल्या अवैध व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी गावात होणाऱ्या अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी ‘मादक द्रव्य नियंत्रण समिती’ स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून गावात होणाऱ्या अवैध दारू निर्मिती व विक्रीवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. या समितीच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून लिंगा झाडे यांची सर्वानुमत्ते निवड करण्यात आली आहे. सचिवपदी ईश्वर शेंडे, सदस्य म्हणून पोच्या बाकीवार, रामलू कुळमेथे, शुभांगी दुर्योधन, सुनंदा शेंडे, वैशाली हजारे, लक्ष्मीबाई आदे यांची निवड करण्यात आली.