गडचिरोली : सुरजागड लोह खदानीवरुन गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आज २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ६ च्या दरम्यान सुरजागड खदानीविरोधात एटापल्ली येथे ठिय्या आंदोलनाला बसलेल्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी अचानक अटक केल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये जि.प. सदस्य सैनु गोटा, रामदास जराते, शिला गोटा, जयश्री वेळदा, मंगेश नरोटी आदींचा समावेश आहे.
गडचिरोली येथील सुरजागड लोहखदान प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक आणि आदिवासी यांनी एल्गार पुकारला आहे. २५ ऑक्टोबर रोजी तब्बल १० हजार आदिवासींनी एकत्र येत एटापल्ली येथे मोर्चा काढून प्रशासनाला खदान कायमस्वरूपी बंद करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर जोपर्यंत खदान बंद होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भुमिका घेत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. आज ठिय्या आंदोलनाचा पाचवा दिवस असताना पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना अटक केली आहे.
दरम्यान, एटापल्ली तालुक्यात आदिवासींचे वास्तव्य असलेल्या पारंपरिक वन क्षेत्रातील सुरजागड भागात लोहखनिज उत्खनन प्रस्तावित करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकुण २५ लोहखाणी प्रस्तावित आहेत. यापैकी सुरजागड येथे खदान सुरु झाली असून स्थानिक नागरिकांनी त्याला जोरदार विरोध केला आहे. 'शेकडो वर्षांपासूनचा हा निसर्गाचा ठेवा हा आमच्यासाठी देवासमान' असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या खदानींमुळे पहाड नष्ट होणार आहे. तसेच लाखो झाडे तोडली जाणार आहेत. याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होऊन पर्जन्यमान कमी होऊन भुगर्भातील पाणी पातळीवरही त्याचा परिणाम होणार आहे. शेतीला याचा मोठा फटका बसणार आहे.
भारतीय संविधान, पेसा कायदा, वनहक्क कायदा यांची पायमल्ली करुन दबावतंत्र वापरुन सुरजागड लोहखदान सुरू असल्याचा आरोप आंदोलक करत आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्यांना अटक झाल्याने आता गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण अजूनच तापले आहे.