# चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरु झाल्यापासून गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायात वाढ
एटापल्ली : एटापल्ली पोलीस गस्तीवर असताना अडीच लाख रुपयांची देशी दारू आणि वाहन असा एकूण साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. या वाहनातील आरोपी मात्र वाहन टाकून पसार झाले.
ठाणेदार विजयानंद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पोलीस गस्तीवर असताना आलापल्ली मार्गावरील वन तपासणी नाक्याजवळ एक पिकअप वाहन उभे होते. पोलिसांची गाडी दिसताच या वाहनाच्या चालकाने वाहनासह एटापल्ली शहरातील मुख्य मार्गावरून जीवगट्टा मार्गावरील सीआरपीएफ कॅम्पपर्यंत पळ काढला. गस्तीवर असलेल्या उपनिरीक्षक रविराज कांबळे व पथकाने या गाडीचा पाठलाग केला. त्यामुळे सीआरपीएफ कॅम्पजवळ दारूचे वाहन सोडून चालक व त्याच्या सहकाऱ्याने अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेतले असता गाडीत देशी दारुचे ४२ बाॅक्स होते. त्याची किंमत अडीच लाख तसेच साडेसहा लाखांचे पिकअप वाहन असा साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. रविवारी दुपारी आरोपींविरुद्ध दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध सुरु आहे. ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवराज कदम घटनेचा तपास करीत आहे.