एटापल्ली : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगडला लागून जारावंडी गाव आहे. या परिसरात ५० ते ६० आदिवासीबहुल गावे आहेत. मात्र या भागात कोणतीच बँक नसून इंटरनेटच्या सुविधेचा अभाव आहे. परिणामी या भागातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी व नागरिक त्रस्त झाले आहेत.
सद्य:स्थितीत बँकेत खाते उघडण्यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच प्रत्येक कामासाठी बँकेचे खाते अनिवार्य करण्यात आले आहेत. प्रत्येक योजनेचा आर्थिक लाभ, कामाच्या मोबदल्याची रक्कम बँकेच्या खात्यावरच जमा केली जात आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांचे अर्थसाहाय्य राष्ट्रीयीकृत बँक खात्यामध्ये जमा होते. महिला बचतगटाचा वाढलेला व्याप व विस्तार, वृद्धांना मिळणारे निवृत्ती अर्थसाहाय्य, घरकुल योजनेच्या बांधकामाचे अनुदान, रोजगार हमी योजनेच्या कामाचा मोबदला, शेतकऱ्यांची पीक कर्ज, सोनेतारण व इतर प्रकारचे कर्ज तसेच विविध योजनेंतर्गत मिळणारी आर्थिक मदत, वैयक्तिक दैनंदिन आर्थिक व्यवहार, असे सर्वच विभाग बँक खात्यामार्फत केले जातात.