या महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समितीचे उपसभापती जनार्दन नल्लावार, तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर गव्हाणे, तालुका कृषी अधिकारी संजयकुमार गायकवाड, दौलतराव दहागावकर, रवी रामगुंडेवार, लक्ष्मण नरोटी, रामजी कत्तीवार, अभय पुण्यमूर्तिवार उपस्थित हाेते.
नैसर्गिकरीत्या जंगलात तसेच शेतामध्ये उगवलेल्या विषमुक्त रानभाज्या निसर्गाची अपूर्व भेट असून, रानभाज्या, कंद व पालेभाज्यांचा समावेश नागरिकांनी रोजच्या आहारामध्ये करावा. यामुळे शरीराला पोषणमूल्य मिळून प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे, असे प्रतिपादन तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी यावेळी केले. तालुका कृषी अधिकारी संजयकुमार गायकवाड यांनी महोत्सवाचे महत्त्व उपस्थितांना विशद करून सांगितले. तसेच उपस्थित मान्यवरांनी शेतकरी गटामार्फत जंगलातील रानभाज्या शहरी भागापर्यंत पोहोचवून विक्रीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी शेतकरी गटांनी विविध प्रकारच्या ३० रानभाज्या प्रदर्शनी व विक्रीसाठी ठेवल्या होत्या. याकरिता महोत्सवात सहभागी गटांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. के. राऊत यांनी केले. आभार अरविंद भरडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तंत्रज्ञान व्यवस्थापक समीर पेदापल्लीवार, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व कार्यालयीन व क्षेत्रीय कर्मचारी तसेच उमेदच्या वंदना गावडे, हर्षा कुमरे यांनी सहकार्य केले.