एटापल्ली तालुक्याचा बहुतांश भाग दुर्गम व ग्रामीण आहे. या परिसरातील नागरिकांना विविध वस्तू खरेदी करण्यासाठी एटापल्ली येथे यावे लागते. आठवडा बाजाराच्या दिवशी आल्यानंतर भाजीपाल्यासह विविध वस्तू ते साेबत घेऊन जातात. त्यामुळे आठवडा बाजाराचे विशेष महत्त्व असल्याने शासनाने प्रतिबंध घातले असले तरी आठवडा बाजार भरविला जात आहे. शासनाचे निर्बंध असल्याने नगर पंचायत आपल्या जागेवर अधिकृतरीत्या बाजार भरवू शकत नाही. त्यामुळे एटापल्लीपासून काही दूर अंतरावर असलेल्या गट्टा मार्गावर बाजार भरविला जात आहे. मात्र या ठिकाणी काहीच सुविधा नाहीत. विक्रेते ताडपत्री बांधून भाजीपाला विकतात. मागील चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने आठवडा बाजाराच्या ठिकाणी चिखल निर्माण झाला आहे. विक्रेत्यांना बसण्यासाठी उंचवटे नसल्याने त्यांनाही चिखलाचा सामना करावा लागत आहे.
एटापल्ली येथील मंगळवारी भरणारा आठवडा बाजार एटापल्ली-गट्टा मार्गावर भरतो. पाऊस आल्याने हा बाजार चिखलात व खाणीत भरला. या बाजारामुळे बाजार व्यावसायिक व ग्राहकांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो. एटापल्ली येथील नियोजित जागेवर बाजार भरावा, अशी मागणी होत आहे.