कोरोना विषाणूचा संसर्ग दुसऱ्यांदा वाढत असल्याने रुग्णांच्या संख्येतही वृद्धी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडी बाजार भरण्यावर बंदी आणली. त्यानुसार तालुका प्रशासनाने कारवाई करीत कुरखेडात भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला. मात्र विक्रेत्यांकडून शहराच्या सीमेबाहेर बाजार भरवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ फासण्यात आला. येथील नियोजित ठिकाणी बाजार भरण्यास मनाई असल्याने विक्रेत्यांनी नगरपंचायतच्या हद्दीबाहेर सती नदीच्या पलीकडे असलेल्या गोठणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत गोठणगाव नाका परिसरात रस्त्याच्या दुतर्फा दुकाने लावून बाजार भरविला. त्यामुळे याठिकाणी वाहतुकीला अडथळा आला. बाजारात माेठ्या प्रमाणात गर्दी उसळली. तालुका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. ग्रामीण भागातही आठवडी बाजार सर्रास भरविले जात असल्याचे दिसून येत आहेत, असा आराेप नागरिकांनी केला आहे.
बाॅक्स
मागील आठवड्यात झाली हाेती बाचाबाची
कुरखेडा येथे मागील आठवड्यात आठवडी बाजार ठराविक ठिकाणी न भरविता कारवाईच्या भीतीपाेटी सती नदीच्या किनारी असलेल्या दसरा मैदानावर भरविण्यात आला होता. त्या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विक्रेत्यांना बाजारातून हुसकावून लावण्यात आले हाेते. दरम्यान विक्रेते व नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी पोलिसांच्या हस्तक्षेपाने प्रकरण निवळले. प्रशासनाने कारवाई केल्यानंतरही दुसऱ्या आठवड्यात बाजार भरविण्याची काय आवश्यकता हाेती, असा सवालही नागरिक करीत आहेत.