देसाईगंज : देसाईगंज शहराच्या नगर भूमापनसाठी येथील भूमी अभिलेख कार्यालयात नगर परिषदेकडून मोजणी शुल्काची रक्कम भरुन मोजणी करण्यात आली नाही. शहरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहराच्या नगर भूमापनाची प्रक्रिया तत्काळ पार पाडावा, अशी मागणी आ. कृष्णा गजबे, नगराध्यक्ष शालू दंडवते व उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.देसाईगंज शहर क्षेत्रात नगर भूमापन करण्यासंबंधी नगर परिषदेच्या मान्यतेने भूमी अभिलेख कार्यालयातर्फे भूमापन कामासाठी ३ कोटी ४८ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने नगर परिषद कार्यालयाकडून ४ जानेवारी २०१८ रोजी २ कोटी ५० लाख रुपये व ६ जुलै २०१८ ला ३ लाख व १९ डिसेंबर २०१८ ला २५ लाख असे एकुण २ कोटी ७८ लाख रूपये भूमी अभिलेख कार्यालयात भरण्यात आले. जवळपास ८० टक्के रक्कम अदा करण्यात आली. परंतु नगर भूमापनाचे काम प्रत्यक्षात झालेले दिसून येत नाही.
देसाईगंज शहरात गावठाण क्षेत्रातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा तत्काळ लाभ मिळावा, यासाठी शहरातील नझुल व गावठाण क्षेत्राचे भूमापन करून सीमा निश्चित करावी. त्याची आखीव पत्रिका नगर परिषद कार्यालयास उपलब्ध करुन देण्यासंबंधात संबंधित विभागास आदेश द्यावे, अशी मागणी आ. कृष्णा गजबे, नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष माेतिलाल कुकरेजा व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली. निवासी उपजिल्हाधिकारी जी. एम. तळपादे यांना निवेदन देताना भाजप जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, आ. डाॅ. देवराव हाेळी, पं. स. सदस्य रामरतन गाेहणे उपस्थित हाेते.
बाॅक्स ..
घरकूल लाभापासून नागरिक वंचित
नगर भूमापनाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शहरातील घरकूल लाभार्थ्यांना घरकुलाच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी कार्यालयाला प्राप्त होत आहेत. परंतु या तक्रारींचीही दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. घरकूल लाभार्थी याेजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी आमदारासह पालिका पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.