आदिवासी विकास महामंडळामार्फत कुरखेडा आविका संस्थेच्या वतीने कुरखेडा खरेदी केंद्रावर जवळपास ६ हजार क्विंटल मका खरेदी करण्यात आला. लवकर पैसे मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना हाेती; परंतु तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही चुकारे मिळाले नाही. शेतकरी वारंवार बँक व आविम कार्यालयात हेलपाटे मारून त्रस्त झाले. सध्या त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी प्रशासनाला जागे करण्याकरिता शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयावर धडक दिली. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडाचे उपाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवानी कुरखेडा आविमचे उपप्रादेशिक व्यवस्थापक बावणे यांच्यासोबत चर्चा करून निवेदन सादर केले. यावेळी उपप्रादेशिक अधिकारी बावणे यांनी वरिष्ठ कार्यालयासोबत चर्चा करून दोन दिवसांत मक्याचे चुकारे अदा केले जातील, असे आश्वासन दिले. त्यामुळे उपस्थित शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले; परंतु या कालावधीत चुकारे अदा करण्यासाठी अधिक उशीर झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या वेळी कुरखेडा आविका संस्थेचे अध्यक्ष बाबूराव तुलावी, शेतकरी माधव तलमले, रामकृष्ण मुंगनकर, गोवर्धन नेवारे, हिराजी कुथे, हेमंत दोनाडकर, प्रभाकर माकडे, आतिश माकडे, बंटी देवढगले, हरिओम मुंगनकर, कुरखेडा आविकाचे व्यवस्थापक घोसेकर व शेतकरी उपस्थित होते.
बाॅक्स
बारदाण्याचे पैसे केव्हा मिळणार?
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या आधारभूत खरेदी केंद्रावर बारदाण्याचा तुटवडा पडल्यानंतर शेतकरी स्वत:कडील बारदाणा देऊन धानाची विक्री करतात; परंतु सदर बारदाणा शेतकऱ्यांना परत केला जात नाही. शेतकरी बांधवांनी मागील दोन वर्षांपासून केंद्रावर दिलेल्या बारदाण्याचे पैसे अथवा बारदाणा परत करण्यात आला नाही. याबाबत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी आश्वासन दिले. मागील दाेन वर्षांपासून बारदाण्याचे पैसे मिळत नसतील तर शेतकऱ्यांनी काय? करावे, असा सवालही उपस्थित शेतकऱ्यांनी याप्रसंगी केला.
130921\img-20210913-wa0114.jpg~130921\img-20210913-wa0112.jpg
महामंडळ अधिकारी याना निवेदन देताना शेतकरी~महामंडळाचे व्यवस्थापक बावणे यांचाशी शेतकरी