गडचिरोली : संपूर्ण जगातील हिंदूंचे श्रध्दास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी आलापल्लीचे प्रसिद्ध सागवान २९ मार्चला चंद्रपूरच्या बल्लारपूरमधून रवाना झाले. मात्र, अयोध्येत सागवान पोहोचण्यापूर्वीच भाजप व काँग्रेसमध्ये राजकीय श्रेयवाद रंगला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्ला चढविला, तर भाजपचे खासदार अशोक नेते यांनी चंद्रपूर येथील शोभायात्रा व काष्टपूजन कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी आलापल्ली येथील मौल्यवान सागवान मागविण्यात आले आहे. सागवान आलापल्लीचे असताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काष्टपूजन व शोभायात्रा चंद्रपूरला घेऊन गडचिरोलीचा मान हायजॅक केल्याचा आरोप करत काँग्रेसने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला. भाजप नेत्यांनी ठरवले असते तर गडचिरोलीत काष्टपूजन व शोभायात्रा निघाली असती. गडचिरोलीचे सागवान असताना चंद्रपूरचा गवगवा का, असा प्रश्न काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला. यास भाजपने अद्याप उत्तर दिलेले नाही, पण खासदार अशोक नेते यांनी चंद्रपूर येथील कार्यक्रमात सहभागी होणे पसंत केले. दरम्यान, पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.
त्यांना शोभायात्रा व काष्टपूजनाची संधी होती; पण मुनगंटीवरांनी बाजी मारल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तथापि, आता काँग्रेसच्या आरोपांवर भाजप काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.