लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचे लसीकरण आता तिसऱ्या टप्प्यात पोहोचले असले तरी अनेकजण अजूनही लसीबाबत साशंक आहेत. ही लस आपण घ्यावी की नाही, अशी त्यांची द्विधामन:स्थिती आहे. विशेषत: जुन्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांना लस घेतल्यानंतर काही रिॲक्शन तर येणार नाही ना, अशी भीती वाटत आहे. आपला आजार जर नियंत्रित अवस्थेत असेल तर कोरोनाची लस घेतलीच पाहिजे, त्याचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही, असा विश्वास तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीस, महसूल कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी यांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यातील दहा हजार कर्मचाऱ्यांपैकी सात हजाराच्या घरात कर्मचाऱ्यांनी लस घेतली. दुसऱ्या टप्प्यात १८ फेब्रुवारीपासून शिक्षक, पत्रकारांसह ज्येष्ठ नागरिक आणि विविध आजारग्रस्त ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. त्यातील १४ हजार लोकांपैकी ५७६५ जणांनी आतापर्यंत लस घेतली. परंतु अजूनही बरेच नागरिक लस घेण्यासाठी पुढे आलेले नाहीत.लस आली त्याच्या सुरुवातीच्या काळात रिॲक्शन आल्याच्या बातम्या वाचण्यात आल्या होत्या. परंतु गडचिरोली जिल्ह्यात अजून लसीमुळे कोणाची प्रकृती फारशी गंभीर झाल्याचे उदाहरण नाही. केवळ एका रुग्णाची प्रकृती बिघडली होती; पण नंतर तो रुग्णही बरा झाला. हृदयरोग, अस्थमा, किडनीचे विकार, मधुमेह अशा कोणत्याही आजाराच्या रुग्णाला ही लस घेता येते, असे डॉक्टर सांगतात.
कोरोनाची लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला जुन्या आजाराबद्दल विचारले जाते. अनेकजण आजाराची फाइल घेऊन येतात. ती पाहुन आणि रुग्णाची तपासणी करून लसीबाबत निर्णय घेतला जाताे. बायपास झालेले किंवा अँजिओप्लास्टी झालेले तर अनेकजण आतापर्यंत येऊन लस घेऊन गेले. कोणावर काही दुष्परिणाम झालेला नाही.- डॉ.आय.जी. नागदेवतेहृदयरोग तज्ज्ञ
सध्या ४५ पेक्षा अधिक वयाच्या व्याधीग्रस्तांना लसीकरणात प्राधान्य दिले जात आहे. आता घरोघरी मधुमेहाचे रुग्ण आढळतात. सरासरी ब्लड शुगर २०० च्या आत असेल तर त्या व्यक्तीला लस घेण्यात काहीच अडचण नाही. ज्या व्याधीने ग्रस्त आहे त्यासंबंधीची औषधी सुरू असेल तरी चालेल, फक्त ती व्याधी नियंत्रणात असेल तर कोरोनाची लस घेता येते.- डॉ.मिलिंद धुर्वेमधुमेह तज्ज्ञ
थंडी-ताप आला तरी घाबरू नयेकोरोनाचा पहिला डोस घेतल्यानंतर काही वेळानंतर थंडी वाजणे किंवा ताप येणे अशी लक्षणे दिसतात. पण अशी लक्षणेही सर्वच रुग्णांमध्ये आढळत नाही. ही लक्षणे आढळली तरी त्यात घाबरण्यासारखे काहीच नसून साधी तापाची गोळी घेतल्यानंतर ताप उतरून प्रकृती नॉर्मल होते, असे डॉक्टर सांगतात. विशेष म्हणजे लस घेतल्यानंतर निरीक्षण कक्षात काही वेळ थांबल्यानंतर तिथेच सर्वांना ताप उतरण्याची गोळी दिली जाते. अनेक जणांवर तर लस घेतल्यानंतर कोणताही परिणाम (रिअक्शन) दिसत नाही.