गोपाल लाजूरकर, गडचिरोली: पंतप्रधान पीक विमा याेजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे संरक्षण करता यावे यासाठी यावर्षी १ रुपयात पीक विमा उतरवण्याची याेजना राज्य शासनाने अंमलात आणली. याचाच फायदा घेत अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला. नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा याेजनेला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असला तरी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्हा तळालाच आहे. ३० जुलैपर्यंत जिल्ह्यातील ८४ हजार ९० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला.
१ ते ३१ जुलै या कालावधीत पंतप्रधान पीक विमा उतरवण्याची सुरुवातीची मुदत हाेती; त्यानंतर यात तीन दिवसांची वाढ करून ती ३ ऑगस्टपर्यंत वाढवली. याचा फायदा इंटरनेट व कव्हरेजची समस्या असलेल्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना घेता येईल. पीक विमा नाेंदणीत शेतकऱ्यांची संख्या वाढेल; परंतु त्यात फारशी वृद्धी काही हाेणार नाही, असेच महिनाभराच्या स्थितीवरून दिसते.
आठवडाभर पाेर्टल डाऊन
पंतप्रधान पीक विमा याेजनेंतर्गत विमा उतरवण्यासाठी केंद्र शासनाने तयार केलेले पाेर्टल २० जुलैपासून डाऊन हाेते. त्यामुळे गडचिराेली जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांना वेळेत खरीप पिकांचा विमा ऑनलाइन नाेंदविता आला नाही. याचा फटका अनेक शेतकऱ्यांना असला; मात्र आता मुदत वाढल्याने त्या शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी नाेंदणी व अर्ज करता येईल.
शेतकऱ्यांमध्ये उत्साह; नाेंदणी तीन पटीहून अधिक
मागील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यात एकूण २ लाख ९७ हजार ७१५ शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा उतरवला हाेता; परंतु यावर्षी १ रुपयात विमा याेजना सुरू केल्याने यावर्षी महिनाभरात ९ लाख ८७ हजार ६४८ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नाेंदणी केेली. विमा संरक्षित क्षेत्रसुद्धा वाढल्याचे दिसून येते.
नागपूर विभागातील पीक विम्याची जिल्हानिहाय स्थिती
जिल्हा : कर्जदार शेतकरी : बिगर कर्जदार : एकूण अर्जदार शेतकरी
- वर्धा : ९, १५२ : १,६०,९५९ : १,७०,१११
- नागपूर : २३,८३२ : १,२६,७४० : १,५०,५७२
- भंडारा : १,३८,४४८ : ५३,९५८ : १,९२,४०६
- गाेंदिया : ६९,०३४ : ९०,९१८ : १,५९,९५२
- चंद्रपूर : १९,६८१ : २,१०,८३६ : २,३०,५१७
- गडचिराेली : २२,३२४ : ६१,७६६ : ८४,०९०
- एकूण : २,८२,४७१ : ७,०५, १७७ : ९,८७,६४८