आरमोरी : वैरागड येथील विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यालयातील कनिष्ठ अभियंत्याचे पद एक वर्षापासून रिक्त हाेते. यथील पद भरण्याची मागणी सातत्याने करण्यात आली. या मागणीची दखल घेत कंपनीकडून हे पद भरण्यात आले आहे.
आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे वीज वितरण कंपनीचे उपकार्यालय असून, या कार्यालयांतर्गत जवळपास ५० गावे येतात. एक वर्षापूर्वी येथील कनिष्ठ अभियंता भोवरे यांची बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त होते. त्यामुळे या भागात विजेच्या संदर्भातील समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. शिवाय या भागातील नागरिकांना विजेच्या व बिलाच्या संदर्भातील समस्या घेऊन आरमोरीला जावे लागत हाेते. त्यामुळे परिसरातील वीज ग्राहकांना शारीरिक, मानसिक त्रासासह आर्थिक फटका बसत हाेता. आरमोरी पंचायत समितीचे उपसभापती विनोद बावनकर व अन्य नागरिकांनी ते रिक्त पद भरण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे सचिव रवींद्र दरेकर यांचे लक्ष वेधले होते. ही बाब लक्षात घेऊन दरेकर यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे वैरागड येथील कनिष्ठ अभियंत्यांचे रिक्त पद भरण्याची मागणी केली. या बाबीची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तत्काळ दखल घेऊन वैरागड येथील विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यालयात नवीन कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे वैरागड परिसरातील विजेची समस्या निकाली निघेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.