लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने शेतकऱ्यांच्या नावावर आणून आपल्या ताब्यात ठेवलेल्या फ्रिजवाल गायी अखेर संबंधित शेतकऱ्यांनाच देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शनिवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला. मात्र वाहतुकीचा खर्च म्हणून प्रतिगाय ५ हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे.शनिवारी (दि.२१) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जि.प.कृषी सभापती नाना नाकाडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त वाय.एस.वंजारी, फार्मर्स कंपनीचे संचालक घनश्याम तिजारे आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्व बाजू समजून घेतल्यानंतर सदर कंपनीने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता गायी आपल्या ताब्यात ठेवल्याची बाब ग्राह्यधरण्यात आली. पशुसंवर्धन विभागाच्या योजनेनुसार सदर फ्रिजवाल गायी शेतकºयांसाठीच आहेत. त्या गायी त्यांनी स्वत:कडे ठेवायच्या की फार्मर्स कंपनीच्या ताब्यात ठेवायच्या हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे शेतकरी जर गायी घेऊन जाण्यास तयार असतील तर त्या त्यांच्या ताब्यात द्याव्या, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यामुळे फार्मर्स कंपनीच्या सर्व मनसुब्यांवर पाणी फेरले जाणार आहे.प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने ज्या शेतकऱ्यांची नावे प्रस्तावात सादर केली होती त्याच शेतकऱ्यांना सदर गायी दिल्या जाणार आहेत, हे विशेष. पशुपालकांनी वाहतुकीच्या खर्चासोबतच दोन महिन्यांच्या संगोपनाचा खर्च द्यावा, अशी भूमिका या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी घेतली. मात्र ती जिल्हाधिकाऱ्यांनी अमान्य करून केवळ वाहतुकीच्या खर्चापोटी ५ हजार रुपये शेतकऱ्यांनी द्यावे असे निर्देश दिले.दरम्यान सदर वाहतूक खर्च देण्यास आणि गायीचे योग्य पालन पोषण स्वत: करण्यासोबतच ती गाय कोणालाही विकणार नाही, असे संमतीपत्र शेतकऱ्यांकडून लिहून घेतले जात आहे. शनिवारी रात्रीपर्यंत हे संमतीपत्र भरून घेण्याचे काम देसाईगंज येथे सुरू होते. सध्या प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीकडे केवळ २७० गायी वाचल्याची माहिती कंपनीच्या संचालकांनी सभेत दिली.शेतकऱ्यांनी मानले ‘लोकमत’चे आभारसदर प्रकरणी ‘लोकमत’ने वृत्तमालिका लावून शेतकºयांच्या नावावर प्रशासनाच्या डोळ्यात कशी धूळफेक होत आहे हे उघडकीस आणले होते. या बातम्यांमुळे आपल्या नावावर गायी आल्या हे अनेक शेतकऱ्यांना प्रथमच कळले. त्यामुळे त्यांनी शनिवारी लोकमतचे आभार व्यक्त करून लोकमतमुळेच आम्हाला या गायी मिळत असल्याची भावना व्यक्त केली.