लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सरकार कोणते बसवायचे एवढी ताकद मतदानामध्ये आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये मतदानाला फार महत्त्व आहे. प्रत्येक मतदाराने मतदान करून लोकशाही सुदृढ करावी, भयमुक्त वातावरणात निवडणुका होतील, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे लोकशाही पंधरवाड्यानिमित्त जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी भुषविले. याप्रसंगी त्या मार्गदर्शन करीत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष योगीता पिपरे, अपर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. टी. पडघन, प्रा. नरेंद्र आरेकर, संजय नाकाडे, श्रीराम लहाने, संध्या येलेकर, विजया मने आदी उपस्थित होते.पुढे बोलताना भांडेकर म्हणाल्या, आपल्या लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीच्या मताला सारखेच महत्त्व आहे. राष्ट्रपतीच्या मताएवढेच मूल्य सामान्य नागरिकांच्या मतालाही आहे. आमच्या मताच्या माध्यमातून आपल्या पसंतीचे उमेदवार संसद व विधानसभेत पाठवू शकतो. याची जाणीव ठेवून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले.कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी मार्गदर्शन करताना नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविताना कोणावरही अन्याय न होता, लाभार्थ्यांच्या दारापर्यंत योजना पोहोचतील, अशी यंत्रणा आपण लोकशाहीत तयार केली. मुलगा जन्माला आल्याबरोबर त्याची नोंद ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका येथे होते. तसेच प्रत्येक मुलगा १८ वर्षाचा झाल्याबरोबर मतदान कार्ड त्याच्या घरी पोहोचेल, अशी व्यवस्था होणे काळाची गरज आहे, असे मार्गदर्शन केले.डॉ. संजय नाकाडे यांनी लोकशाहीत जनता मालक आहे. काम करणारी प्रशासकीय यंत्रणा सेवक आहे. परंतु सेवकांकडूनच मालकांना प्रशिक्षण देण्याचे, जागृत करण्याची गरज का भासावी, याचे आश्चर्य वाटते. निवडणूक आचार संहिता लागू करून निवडणुका कशा पारदर्शी पार पाडता येईल, याकडे विशेष लक्ष दिल्याने आज बऱ्यापैकी सुधारणा झाल्या आहेत. मतदान करण्याच्या हक्कापासून वंचित राहू नये, असे मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. नरेंद्र आरेकर, श्रीराम लहाने, संध्या येलेकर, विजया मने यांनीही विचार मांडले. संचालन व आभार नायब तहसीलदार सुनील चडगुलवार यांनी मानले.
सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदान करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 11:39 PM
सरकार कोणते बसवायचे एवढी ताकद मतदानामध्ये आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये मतदानाला फार महत्त्व आहे. प्रत्येक मतदाराने मतदान करून लोकशाही सुदृढ करावी, भयमुक्त वातावरणात निवडणुका होतील, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.
ठळक मुद्देजि.प. अध्यक्षांचे आवाहन : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय चर्चासत्र