११०५ शौचालये पूर्ण : २ हजार ४५ शौचालय मंजूर गडचिरोली : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत गडचिरोली नगर पालिका प्रशासनाला शासनाने ३ हजार ५ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले. यापैकी पालिका प्रशासनाने आतापर्यंत १ हजार १०५ शौचालयाचे काम पूर्ण केले आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने गडचिरोली शहरात सुरू असलेल्या वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामावर आतापर्यंत २ कोटी ६७ लाख ५ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. नगर पालिका प्रशासनाच्या वतीने गडचिरोली शहरात जुलै २०१५ पासून शौचालय निर्मितीचे काम हाती घेण्यात आले. शौचालय योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील सर्वच वार्डांमध्ये फिरून किती कुटुंबधारकांकडे शौचालय आहेत, किती कुटुंबाकडे शौचालय नाही, याबाबतचे सर्वेक्षण केले. त्यानंतर शौचालय नसणाऱ्या कुटुंब प्रमुखांना नगर पालिका कार्यालयात अर्ज दाखल करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. वैयक्तिक शौचालयाच्या लाभासाठी गडचिरोली शहरातून आतापर्यंत एकूण २ हजार ५२३ लाभार्थ्यांचे अर्ज पालिका प्रशासनाला प्राप्त झाले. २ हजार ४५ लाभार्थ्यांना शौचालयाचे बांधकाम सुरू करण्यासाठी अग्रीम स्वरूपात पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम प्रत्येकी सहा रूपये अदा करण्यात आली आहे. पालिकेला शौचालय योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला केंद्र सरकारकडून १२ हजार रूपये अनुदान देय आहे. एवढ्या रक्कमेत शौचालयाचे बांधकाम शक्य नसल्याची बाब लक्षात आल्यावर पालिका प्रशासनाने आपल्या स्तरावरून लाभार्थ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिका प्रशासनातर्फे शौचालय लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपये अनुदान दिले जात आहे. केंद्र सरकार व पालिका प्रशासन मिळून लाभार्थ्यांना एकूण १७ हजार रूपयांचे अनुदान दिले जात आहे. संबंधित लाभार्थ्याने काम पूर्ण झालेल्या शौचालयाचे फोटो सादर केल्यानंतर पडताळणीची कार्यवाही केली जात आहे. त्यानंतर अहवाल प्राप्त होताच पालिका प्रशासनातर्फे संबंधित लाभार्थ्यांना शिल्लक अनुदान दिले जात आहे. नगर पालिकेचे एक पथक दर आठवड्याला शहरात फिरून शौचालयाची स्थिती जाणून घेत आहे. यावर मुख्याधिकारी लक्ष ठेवून आहेत. (स्थानिक प्रतिनिधी) ३१ मार्च २०१७ अखेरची डेडलाईन वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम मंजूर झालेल्या संबंधित लाभार्थ्याने शौचालयाचे काम विहीत वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित लाभार्थ्यांना नगर पालिका प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. शासनाने गडचिरोली शहरातील मंजूर शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१७ पर्यंत दिली आहे. येत्या अडीच महिन्यांच्या कालावधीत शहरातील सर्वच शौचालयाचे काम पूर्ण करण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे. त्या दिशेने प्रशासन प्रयत्न करीत आहे. शहर गोदरीमुक्तीसाठी कारवाईचा इशारा गडचिरोली नगर पालिका क्षेत्रात उघड्यावर शौचास जाणाऱ्या जागांबाबत सर्वेक्षण करण्यात आले. ज्या खुल्या परिसरात शौचास जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्या क्षेत्राला प्रतिबंधक क्षेत्र म्हणून पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. या परिसरात उघड्यावर शौचास बसणाऱ्या संबंधित इसमाविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी नगर परिषद गडचिरोली यांनी दिला आहे. पालिकेचे पथक अशा जागांच्या परिसरात दररोज सकाळच्या सुमारास नियंत्रण ठेवीत आहेत. त्यामुळे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना चाप बसला आहे.
शौचालयावर अडीच कोटींहून खर्च
By admin | Published: January 08, 2017 1:33 AM