एटापल्ली एसडीओ करणार सुनावणीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात ३ मे २०१७ रोजी पोलीस पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दुपारी २ वाजताच्या दरम्यान पोलीस-नक्षल यांच्यात चकमक घडून आली. या चकमकीची दंडाधिकारीय चौकशी केली जाणार आहे.जंगलात झालेल्या चकमकीत तीन जवान जखमी झाल्याने त्यांना भामरागड येथे उपचारासाठी आणण्याकरीता भामरागड येथून विशेष अभियान पथक, प्राणहिताचे पथक एमपीव्ही वाहनाने पाठविण्यात आले. त्यानंतर मनोहर महाका व ईश्वर गोटा यांच्या दोन पार्ट्या एका मागोमाग योग्य अंतर ठेवून एमपीव्ही वाहनाने भामरागडकडे परत येत असताना सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास कारमपल्ली-हेमलकसा गावादरम्यान रोडवर नक्षलवाद्यांनी मागील एमपीव्ही वाहनाखाली शक्तीशाली भुसूरुंग स्फोट घडवून आणला. त्यात एक जवान शहीद, पाच जवान गंभीर जखमी व १५ जवान किरकोळ जखमी झाले असल्याचे पोलीस अधिक्षक यांनी पाठविलेल्या अहवालात दिसून येते. सबब शहीद जवानाचा मृत्युच्या कारणाचा शोध लावणे आवश्यक असल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७६ अन्वये दंडाधिकारीय चौकशी करावयाची आहे. जाहीररित्या सुचित करण्यात येते की, या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छीणाऱ्यांनी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय एटापल्ली येथील कार्यालयात १५ जुलै २०१७ रोजी किंवा तत्पुर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावे. यामध्ये घटनेचे पाहिल्याप्रमाणे वर्णन, आपला या घटनेविषयीचा अनुभव, घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी संबंधित काही घटना घडली असल्यास त्याविषयी माहिती, सरकारी किंवा अन्य यंत्रणेच्या प्रतिक्रीया किंवा सहभाग यांच्याविषयी आपले म्हणने, तसेच या घटनेशी संबंधित इतर कोणतीही माहिती असल्यास द्यावी. असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांनी केले आहे.
कोपर्शीतील स्फोटाची दंडाधिकारीय चौकशी
By admin | Published: July 14, 2017 2:04 AM