देसाईगंज : स्थानिक रेल्वे स्टेशनवर थांबा असलेली बिलासपूर-चेन्नई ही एक्सप्रेस रेल्वे गाडी जुलै महिन्यापासून शहरातील रेल्वे स्थानकावर थांबणार नाही़ रेल्वे प्रशासनाव्दारे लोकसभा निवडणुकीनंतर लगेच थांबा बंद होणार असल्याने शहरवासीयांना धक्का बसला आहे़ नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी थांबा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी रेल्वे प्रशांकडून केली जात आहे.देसाईगंज हे औद्योगिक शहर असून परिसरातील व्यावसायिक मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करतात. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतरही नागरिक दुसऱ्या राज्यात जायचे असल्यास सर्वप्रथम देसाईगंज येथूनच पुढील प्रवासाला सुरूवात करतात. त्यामुळे या रेल्वे स्थानकावर नेहमीच गर्दी राहते. त्यामुळे देसााईगंज येथे बिलासपूर-चेन्नई एक्सप्रेसचा थांबा देण्याची मागणी तालुक्यासह जिल्ह्यातील प्रवाशांकडून करण्यात आली होती. प्रवाशांच्या मागणीनुसार व अथक प्रयत्नाने या मार्गावरून धावणाऱ्या बिलासपूर- चेन्नई रेल्वे गाडीला देसाईगंज येथे थांबा देण्यात आला होता. आठवड्यातून ही रेल्वे रविवारला बिलासपूरकडे जाते तर मंगळवारला चेन्नईकडे जाते़ मात्र येत्या १ जुलैपासून चेन्नईला जाणाऱ्या व २७ जुलैपासून बिलासपूरला जाणाऱ्या रेल्वेचा शहरातील थांबा बंद होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लगेच थांबा बंद होत आहे. दरवर्षी जून, जुलै महिन्यात या एक्सप्रेस गाडीचा थांबा रेल्वे पोर्टलवरून उडत असल्याचे देखील रेल्वेच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी सांगितले़ त्यामुळे या एक्सप्रेस गाडीचा कायमचा तोडगा निघने आवश्यक आहे. गोंदिया-बल्लारपूर या दोन्ही जन्शनच्या मध्यवर्ती ठिकाणी वडसा रेल्वे स्टेशन असल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक एक्सप्रेस गाडीचा थांबा शहरात पाहिजे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. देसाईगंज येथून जाणाऱ्या प्रत्येक एक्सप्रेसला थांबा देसाईगंज येथे असावा, अशी येथील नागरिकांची आग्रही भूमिका आहे. इतर सर्व रेल्वे गाड्यांना प्रवाशी मिळत असतांना बिलापूर व चेन्नई याच रेल्वेगाडीला देसाईगंज येथून प्रवासी मिळत नसल्याचा रेल्वे कर्मचाऱ्यांनी काढलेला अंदाज चुकीचा आहे. जुलै व जून महिन्यात रेल्वे प्रवाशांची संख्या थोडी कमी होत असेल. एवढे मान्य केले तरीही एवढ्या कारणासाठी रेल्वे थांबाच रद्द करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे, अशी टीका सामान्य नागरिकांकडून रेल्वे प्रशासनावर केली जात आहे. मिटींगनंतरच्या निर्णयाकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. बिलासपूर- चेन्नई एक्सप्रेसचा थांबा रद्द झाल्यास प्रवाशांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.(वार्ताहर)
एक्सप्रेसचा थांबा रद्द होणार
By admin | Published: June 15, 2014 11:33 PM