गडचिरोली : किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सन २०१३-१४ च्या धान खरेदीसाठी केंद्र शासनाने फेब्रुवारी २०१४ पर्यंत मुदत दिली होती. धान्य खरेदीची मुदत संपल्याने जिल्ह्यातील धान खरेदी थांबली होती. परंतु केंद्र शासनाकडे धान्य खरेदीची मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आल्याने धान्य खरेदीसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये जानेवारी व फेब्रुवारी दरम्यान धान्य खरेदी बंद करण्यात आली आहे. परंतु महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यात उन्हाळी धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने ऐन धान खरेदीच्या वेळेस मुदत संपली होती. त्यामुळे जिल्ह्यात धान्य खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी व लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. त्या अनुषंगाने धान खरेदीस मुदतवाढ देण्यासाठी केंद्र शासनाकडे २७ मे रोजी विनंती करण्यात आली होती. मात्र अजुनपर्यंत धान्य खरेदीस केंद्र शासनाकडून मुदतवाढ प्राप्त झाली नाही. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य शासनाने उन्हाळी धान खरेदीची मुदत ३० जून २०१४ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
धान्य खरेदीसाठी ३० पर्यंत मुदतवाढ
By admin | Published: June 13, 2014 12:07 AM