लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०१९-२०२० पदवी-पदव्यत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला शिकणारे जे विद्यार्थी परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यापासून वंचित राहिले आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना उन्हाळी २०२० परीक्षेसाठी आवेदनपत्र सादर करण्याकरिता गोंडवाना विद्यापीठाने २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने ही मागणी करण्यात आली होती.२० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अनिल चिताडे यांनी १५ सप्टेंबर रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे.
युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे उन्हाळी परीक्षेसाठी अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात युकाँच्या कार्यकर्त्यांनी ना.सामंत यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे विद्यार्थ्यांची अडचण मांडली. त्यानंतर विद्यापीठाने उन्हाळी परीक्षेला अर्ज भरण्यासाठीची मुदत २० सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचे परिपत्रक काढले. विहीत मुदतीत विद्यार्थ्यांनी शुल्कासह परीक्षेचे आवेदनपत्र भरावे. मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत आवेदनपत्र स्वीकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे परीक्षा मंडळाचे संचालक डॉ.चिताडे यांनी म्हटले आहे.