चामोर्शी : जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा सात-बारा ३० एप्रिल २०२१ पूर्वी ऑनलाईन न झाल्याने धान विक्री झालेली नव्हती. शेतात, घरी आणि धान खरेदी केंद्रांवर धान पडून होते. त्यामुळे शासनाने ३१ मे पर्यंत धान खरेदीच्या ऑनलाईन प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली होती. शासनाने ही मागणी मंजूर करत मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील काही दिवसांपासून डॉ. होळी यांनी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धानाची विक्री ऑनलाईन प्रक्रिया न झाल्यामुळे रखडलेली असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठामंत्री, आदिवासी विकासमंत्री, प्रधान सचिव, जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे धान खरेदीची मुदत वाढविण्याची विनंती केली होती.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या धानाची ऑनलाईन प्रक्रिया ३१ मेपूर्वी करून घ्यावी, असे आवाहन आ. डॉ. होळी यांनी शेतकऱ्यांना केले आहे.