एटापल्ली : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या आदिवासी बहुल हेडरी येथील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करीत यावर्षी पहिल्यांदाच हरभरा व ज्वारीच्या पिकाचे भरघोस उत्पादन घेतले आहे. हेडरी गावातील बहुतांश शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेतात. मात्र धान पीक निघाल्यानंतर त्या शेतीमध्ये इतर कोणतेही उत्पादन घेतले जात नव्हते. परिणामी सदर जमीन पडित राहत होती. ही बाब पोलीस विभागाच्या लक्षात आल्यानंतर हेडरी येथील पोलीस मदत केंद्रातर्फे या गावातील शेतकऱ्यांना हरभरा व ज्वारीच्या बियाणांचे वाटप करण्यात आले. पिकाची पेरणी करण्यापासून त्याची योग्य काळजी घेण्याबाबत कृषी सहाय्यक गिरासे यांनी योग्य मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ घेत हेडरी येथील रानू गब्बा लेकामी, टिबरू डोबी गोटा, समा बकलू उसेंडी, बदू लालसू कातवो, बंडू वेलादी, कांदो अडवे, या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ज्वारी व हरभऱ्याचे पीक फुलविले आहे. सदर पिकांची लागवड करण्यासाठी प्रभारी पोलीस अधिकारी विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक राखोंडे, राजपूत, देशपांडे, दत्ता घुले, राजू पंचफुलीवार, शिवाजी शिंदे, रवी बोरीवार यांनी प्रोत्साहित केले. अत्यंत कमी खर्चामध्ये येथील शेतकऱ्यांनी हरभरा व ज्वारीचे भरघोस उत्पादन घेतले आहे. (तालुका प्रतिनिधी)
हेडरीत झाले ज्वारीचे भरघोस उत्पादन
By admin | Published: March 30, 2015 1:27 AM