वन विभागाचा पुढाकार : कन्हाळगाव व गर्दापल्लीत २३ नागरिकांना सौरदिव्यांचे वाटप एटापल्ली : भामरागड वन परिक्षेत्र व एटापल्ली तालुक्याच्या कसनसूर वन परिक्षेत्रातर्फे कन्हाळगाव व गर्दापल्ली येथे नागरिकांना २३ सौरदिव्यांचे वाटप करण्यात आले. घरी वीज पुरवठ्याची सोय नसलेल्या या दोन्ही गावातील आदिवासी नागरिकांना सौरदिव्यांच्या माध्यमातून प्रकाशाची सुविधा निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक दुर्गम गावांमध्ये अद्यापही वीज पोहोचली नाही. त्यामुळे या नागरिकांना केरोसीनच्या दिव्यावर भागवावे लागते. सदर अडचण लक्षात घेऊन वन विभागामार्फत गेल्या काही वर्षांपासून सौरदिवे वाटपाची योजना राबविली जात आहे. वीज पुरवठा नसलेल्या गावात अनुसूचित जमातीच्या लोकांना भामरागड व कसनसूर वनपरिक्षेत्र कार्यालयातर्फे २३ सौरदिव्यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी वनकर्मचारी बी. पी. मानापुरे, एम. एन. मेश्राम, बी. एन. देवकाते, एन. आर. सयाम आदी उपस्थित होते. भामरागडचे उपवनसंरक्षक एन. चंद्रशेखरन बाला, सहायक उपवनसंरक्षक एम. बी. कुसनाके, कसनसूरचे वन परिक्षेत्राधिकारी एन. जी. झोडे यांच्या मार्गदर्शनात वन कर्मचाऱ्यांनी सदर उपक्रम राबविला. (तालुका प्रतिनिधी)
सौरदिव्यातून दुर्गम गावात प्रकाशाची सुविधा
By admin | Published: March 13, 2017 1:23 AM