देसाईगंज : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे हाहाकार माजला असताना शहरात व तालुक्यात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करताना दिसून येत नाही. सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या प्रशासनाला अद्याप जाग आली नसल्याने शहरात ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.
व्यापारीदृष्ट्या देसाईगंज शहर हे तालुक्यातील अति महत्त्वाचे शहर आहे. तालुक्यासह लगतच्या जिल्ह्यातील नागरिक खरेदी, विक्रीच्या संबंधाने देसाईगंज शहरात अवागमन करीत आहेत. सध्या सर्वच व्यापार उद्दीम ज्या ठिकाणाहून चालओ. ते नागपूर शहर हे कोरोनाचे हॉटस्पाॅट ठरलेले आहे. दररोज त्या ठिकाणाहून भाजीपालापासून अनेक ट्रान्सपोर्टने माल देसाईगंजात पोहोचत आहे. शहरातील मोठी व्यापारी प्रतिष्ठाने, गुजरी बाजार, बसस्टॉप परिसर या ठिकाणी विद्यार्थीवर्गापासून, तर आबाल वृद्धापर्यंत तोबा गर्दी होताना दिसून येत आहे. विशेष बाब अशी की, या कालावधीत एखाद्याची मयत झाल्यासही २० पेक्षा अधिक नागरिकांना अंत्यविधीला उपस्थित राहता येणार नाही. लग्न संभारंभात ५० पेक्षा अधिक नागरिकांना भाग घेता येणार नाही. मास्कचा वापर केल्याशिवाय दुकानात प्रवेश घेता येणार नाही. खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अनिवार्य केले आहे. मात्र, देसाईगंज तालुक्यात नियम धाब्यावर बसवत लग्नकार्य, सामूहीक भोजनाचे कार्यक्रम, अंत्यविधीला शेकडो नागरिकांची उपस्थिती हे प्रकार सुरु आहेत. प्रशासकीय यंत्रणा मूग गिळून हे सगळे बघत आहे.
जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाला मार्गदर्शक नियमावली देऊनही त्याची अमलबजावणी होताना दिसत नाही. नागरिक नियमांना बगल देत स्वैरपणे वागत असल्याने शहरासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे.