लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नागपूर येथे वास्तव्यास असलेल्या बीएसएनएलच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा गडचिरोलीतील प्लॉट, त्यांचे बनावट आधारकार्ड बनवून परस्पर विकल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी चंद्रपूर येथील तिघांना अटक करण्यात आली. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे याच पद्धतीने आणखी कोणाची फसवणूक होण्याचा प्रकार यशस्वी होऊ शकला नाही. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नागपूरच्या उपलवाडी भागात राहात असलेले किशन लक्ष्मण खोब्रागडे (७४ वर्षे) यांनी गडचिरोली येथे १९८७ मध्ये २७४.६२ चौरस मीटर प्लॉट विकत घेतला होता. तो प्लॉट त्यांना विकायचा असल्याने तीन वर्षांपूर्वी त्यांनी तिथे तसा बोर्ड लावला होता. त्याचा फायदा घेत चंद्रपूर येथील आरोपी महेंद्र नामदेव गेडाम (४४ वर्षे, रा. जलनगर वॉर्ड, चंद्रपूर) आणि चंद्रशेखर रामलखन घुगुवा (३० वर्षे, रा. रयतवारी कॉलरी, चंद्रपूर) यांनी अशोक सोनाजी इंगळे (५८ वर्षे, रा.बल्लारशा बायपास रोड, चंद्रपूर) यांना आपला प्लॅन सांगितला. त्यानुसार इंगळे यांनी आपले आधार कार्ड गेडाम व घुगुवा यांना दिले. त्यांनी त्यावरून प्लॉट मालक किशन लक्ष्मण खोब्रागडे यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड बनविले. एवढेच नाही तर त्या प्लॉटची त्यांनी दोन जणांना परस्पर विक्रीही केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी त्या परिसरातील प्लॉटच्या विक्रीवर बंदी घातल्याने आरोपींचा याच पद्धतीने इतरांची फसवणूक करण्याचा डाव यशस्वी होऊ शकला नाही. याप्रकरणी अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.आधारवरील फोटोवरून काढला मागआपल्या प्लॉटची परस्पर कोणीतरी विक्री केल्याचे लक्षात आले त्यावेळी मूळ मालक खोब्रागडे यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी गडचिरोली पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर बनावट आधार कार्डवर लावलेला फोटो कोणाचा आहे याचा शोध घेतला. खबरींच्या माहितीवरून तो चंद्रपूर येथील व्यक्तीचा असल्याचे दिसले. त्यानुसार त्या व्यक्तीचा माग काढत मोठ्या शिताफीने तीनही आरोपींना अटक करण्यात आली. तूर्त त्यांची जामिनावर सुटका झाली असली तरी पुढील तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गोपाले यांनी सांगितले.