गडचिरोली - येथील पोलिस भरतीत काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाले होते. याचे राज्यभर मोठे रॅकेट उघडकीस आल्यानंतर आता खेळाचेही बनावट प्रमाणपत्र देऊन लाभ घेतल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने गुन्हे शाखेकडून नवप्रविष्ठ १५ पोलिसांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी सुरु केली आहे.
जिल्हा पोलिस दलातच चार महिन्यांपूर्वीच भरती प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण ३४८ जागांसाठीच्या या भरतीत काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांच्या कोट्यातून नियुक्ती मिळवली होती. मात्र, हे उमेदवार व त्यांचे कुटुंबीय वर्षानुवर्षे गडचिरोलीचे रहिवासी असताना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मात्र बीड येथील असल्याने ते नियमबाह्य असल्याचा दावा एका निनावी पत्राद्वारे केला होता. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना हे निनावी पत्र प्राप्त झाले होते. या पत्राआधारे चौकशी केली असता बनावट प्रमाणपत्र देत नोकरीचा लाभ घेतल्याच्या आरोपावरुन दोन नवप्रविष्ठ पोलिसांसह नियुक्तीच्या प्रतीक्षेतील एकास अटक झाली होती. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी बनावट प्रमाणपत्र सादर करुन भरती झालेल्या उमेदवारांचे तसेच हे प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या रॅकेटमधील लोकांचे अटकसत्र राबविले होते. आता खेळाचे बनावट प्रमाणपत्र देऊन पोलिस दलात भरती झालेले उमेदवार देखील चौकशीच्या रडारवर आले आहेत, खेळाचे बनावट प्रमाणपत्र देऊन त्यांनी खेळाडू कोट्यातून भरतीचा लाभ घेतल्याची शंका आहे. त्यानुषंगाने गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरु आहे. याबाबत पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना संपर्क केला असता त्यांनी यास दुजोरा दिला. चौकशी पूर्ण झाल्यावर यातील तथ्य समोर येईल, असे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
प्रमाणपत्रांबाबत केली जातेय खातरजमा
दरम्यान, जिल्हा पोलिस दलात खेळाडूंसाठी ५ टक्के जागा आरक्षित आहेत. याद्वारे जवळपास १५ जणांची निवड झालेली आहे. ते सध्या खात्यात रुजू असून प्रशिक्षण सुरु आहे. मात्र, भरती होताना सादर केलेल्या खेळाच्या प्रमाणपत्रावरुन शंका निर्माण झाल्याने या आरक्षणाचा लाभ घेतलेले सर्वच उमेदवारांच्या दस्ताऐवजांची पडताळणी सुरु असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली.