आष्टी : आष्टीपासून ३ किमी अंतरावर असलेल्या मार्र्कं डा कं. येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या खुल्या आवारात ३ ते ४ वर्षापासूनचे धान्य उघड्यावर आहे. उघड्यावरील धान्य खाण्यासाठी गेलेल्या म्हशीचा तोल अचानक विहिरीत गेल्याने पडून मृत्यू झाला. शनिवारी राजेश्वर मलय्या जागरवार यांनी आपल्या म्हशी जंगलात चराईकरिता सोडल्या होत्या. उन्हाळय़ाचे दिवस असल्याने म्हशी पाण्याच्या शोधात भटकल्या. त्यामुळे रात्र उलटूनही म्हशी घरी न परतल्याने जागरवार यांनी म्हशींची शोधाशोध सुरू केली. तेव्हा काही म्हशी धान्याच्या ढिगार्यावर चढून धान्य खातांना दिसल्या. ढिगार्यावर असलेल्या म्हशींना जागरवार यांनी घरी आणले. परंतु एका म्हशीचा पत्ता न लागल्याने चौकीदारास विचारले असता विहिरीत काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला असे सांगितले. रात्रीच्या सुमारास टॉर्च लावून विहिरीत पाहिले असता काहीच आढळले नाही. परंतु सकाळी पाहिले तर म्हैस मृतावस्थेत आढळली. आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या आवारात ३ वर्षापासून खरेदी करण्यात आलेले धान्य सडल्याने जनावरे धान्य खाण्यासाठी धान्याच्या ढिगार्यावर चढतात. जनावरांच्या बंदोबस्तासाठी संरक्षक भिंत अथवा कुंपणही नसल्याने जनावरे ढिगावर सहज चढतात व धान्य खातात. धान्याच्या आवाराला कुंपण नसल्यानेच म्हशीचा मृत्यू झाला. त्यामुळे आदिवासी विविध कार्यकारी संस्थेने म्हशीचे मालक राजेश्वर जागरवार यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर घटनेच्या संदर्भात आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. म्हशीचा मृत्यू झाल्याने जागरवार यांचे २५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. जागरवार यांना संस्थेच्यावतीने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तंटामुक्त समितीच्यावतीने करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
विहिरीत पडून म्हशीचा मृत्यू
By admin | Published: May 25, 2014 11:33 PM