लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाचे मुख्यालय गुरूवारी दुपारी पुन्हा एकदा हेलावून गेले. शहीद पोलीस कुटुुंबियांच्या परिवारातील सदस्यांनी फोडलेल्या आर्त टाहोमुळे कणखर पोलिसांसह सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले. अतिशय दु:खद वातावरणात १५ शहीद जवानांसह भूसुरूंग स्फोटातील मृत वाहन चालक खोमेश्वर भागवत सिंगनाथ (२५) रा.कुरखेडा याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.पोलीस मुख्यालयातील मैदानात मध्यभागी उभारलेल्या शामियान्यात सर्व १६ जणांचे पार्थिक ठेवण्यात आले होते. दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री, इतर मंत्रीगण तथा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सर्व पार्थिवांना पुष्पचक्र वाहिले. त्यानंतर पोलिसांनी सलामी दिली. यावेळी आपसुकच शहीदांच्या परिवारातील सदस्यांचेही हात त्यांना अखेरचा सॅल्युट ठोकण्यासाठी सरसावले होते. मैदानाच्या चहुबाजूने बघ्यांची एकच गर्दी जमली होती. मैदानाच्या एका बाजुला शहीद परिवारातील कुटुंबियांच्या बसण्याची व्यवस्था केली होती. मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यापर्यंत पार्थिवाजवळ जाण्याची कोणालाही परवानगी नव्हती. त्यामुळे लांबूनच शामियान्यात बसून हे कुटुंबिय पार्थिवाच्या दिशेने नजर लावून टाहो फोडत होते. त्या अतिशय धीरगंभीर वातावरणात केवळ त्यांचा विलाप हृदयाला पाझर फोडत होता. अनेक जण आपल्या परिवारातील सदस्य गमविल्याच्या, कोणी मित्र गमविल्याच्या तर कोणी गावातील शेजारी गमविल्याच्या दु:खाने गहिवरत होता.
कुटुंबीयांच्या विलापाने सर्वांचे डोळे पाणावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 12:12 AM
गडचिरोली पोलीस दलाचे मुख्यालय गुरूवारी दुपारी पुन्हा एकदा हेलावून गेले. शहीद पोलीस कुटुुंबियांच्या परिवारातील सदस्यांनी फोडलेल्या आर्त टाहोमुळे कणखर पोलिसांसह सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले.
ठळक मुद्देदु:खद अंतकरणाने निरोप : सर्वांची भावपूर्ण श्रद्धांजली