गडचिराेली : शेतावर गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. गंगाराम कवडू फुबेलवार (५५, रा. भगवानपूर, ता. गडचिराेली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.गंगाराम फुबेलवार यांची जंगलालगत धानाची शेती आहे. ते धान पिकाची राखण करण्यासाठी शेतात गेले हाेते. दरम्यान, त्यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. त्यांचा मुलगा व पत्नी नागपूरला राहत असल्याने गंगाराम हे दिवाळीच्या कालावधीत मुलांकडे राहण्यासाठी नागपूरला गेले असावेत, असा अंदाज गावातील लाेकांनी बांधला. मात्र, धान कापण्याजाेगे हाेऊनही ते शेतात येत नव्हते. त्यामुळे गावातील नातेवाइकांनी ही माहिती त्यांच्या मुलांना दिली व त्यांच्याबाबत विचारणा केली. मात्र, ते नागपुरला नाहीत असे सांगण्यात आले.
फुबेलवार यांची शेती असलेल्या परिसरात वाघांचा वावर आहे. त्यामुळे वाघाने हल्ला केला असावा, असे अंदाज बांधण्यात आला. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभाग व गावकऱ्यांनी जंगलात शाेधमोहीम राबवली. यादरम्यान डाेक्याच्या कवठीचा भाग व हाताचे पंजे दिसून आले. त्यांच्या हाताला राखी बांधली हाेती. या राखीवरून त्यांची ओळख पटविण्यात आली. वनविभाग व पाेलिसांनी जागेवरच पंचनामा केला.