लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : रेगडी तलावाचे पाणी न मिळाल्याने धान पीक करपले. प्रशासनाविरोधात संतप्त झालेल्या तालुक्यातील दोटकुली येथील साईनाथ ढोबे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील धान पिकालाच आग लावली.दोटकुली हे गाव चामोर्शी तालुक्यातील सर्वात शेवटचे गाव आहे. सदर गाव वैनगंगा नदीला लागून आहे. या गावापर्यंत कन्नमवार जलाशयाचा कालवा गेला आहे. मात्र सदर गाव सर्वात शेवटी आहे. त्यामुळे या गावापर्यंत पाणी पोहोचत नाही. तसेच अनेक ठिकाणी कालवा बुजला असतानाही सिंचन विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे दोटकुली गावापर्यंत पाणी पोहोचलेच नाही. कालवा दुरूस्त करावा तसेच पाणी शेवटच्या शेतकऱ्याला पोहोचेल या दृष्टीने नियोजन याबाबत अनेकवेळा निवेदन देऊनही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परिणामी दोटकुलीसह घारगाव या गावांमधील अनेक शेतकऱ्यांचे धान पिक करपले. हातात आलेले पाणी करपताना बघून शेतकरी हवालदील झाला आहे. मागील वर्षी तुडतुडा रोगाने धान उद्धवस्त केले तर यावर्षी पाण्याअभावी धान करले. धान रोवणीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.पाण्याअभावी दोटकुली येथील साईनाथ ढोबे या शेतकऱ्याचे दोन एकरातील पीक करपले. त्यामुळे निराश झालेल्या साईनाथने उभ्या धानपिकाला आग लावली. ही बाब माहित झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य कविता भगत, माजी पं.स. सदस्य प्रमोद भगत, पं. स. सदस्य धर्मशिला सहारे, सरपंच जानकिराम ढोबे, कवलू पुटकमवार, सतीश पुटकमवार, प्रमोद सहारे, नोमजी सातपुते, नरेंद्र पोरटे, मोरोती ढोबे यांनी शेताची पाहणी केली. ढोबे यांच्या शेताजवळीलही शेतकऱ्यांचे धान करपले आहे.चामोर्शी तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील धानपीक करपले आहे. त्यामुळे चामोर्शी तालुका दुष्काळ घोषित करावा, तसेच शेतकऱ्यांना विहीर बांधून द्यावी, भारनियमनाच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कविता भगत यांनी केली आहे.
शेतकऱ्याने लावली धानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 1:25 AM
रेगडी तलावाचे पाणी न मिळाल्याने धान पीक करपले. प्रशासनाविरोधात संतप्त झालेल्या तालुक्यातील दोटकुली येथील साईनाथ ढोबे या शेतकºयाने आपल्या शेतातील धान पिकालाच आग लावली.
ठळक मुद्दे दोटकुलीतील घटना : चामोर्शी तालुक्यातील धान करपले