सिरोंचा : आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदीची मर्यादा यावर्षी १२ क्विंटलवरून ९.६० क्विंटल करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना उर्वरित धान विक्री करण्याची वेळ आली आहे. शासनाने धान खरेदीची मर्यादा वाढवून २० क्विंटल करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्राकडे पाठ फिरविली आहे.
सिराेंचा तालुक्यातील आधारभूत खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी शेतकरी अद्यापही धान घेऊन गेले नाहीत. केंद्राकडे अद्यापही शेतकऱ्यांनी पाठच फिरविली आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुडेवार यांनी गुरुवारी अमरावती येथील केंद्राला भेट देऊन नारायणपूर येथील धान उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करावी, अशी विनंती त्यांनी शेतकऱ्यांना केली, परंतु शेतकऱ्यांनी धान खरेदीची मर्यादा एकरी २० क्विंटलपर्यंत वाढवावी. खरेदीची मर्यादा न वाढविल्यास आधारभूत केंद्रावर धान विक्री करणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच धान खरेदी करण्याची मर्यादा अद्याप न वाढविल्याने महामंडळ व सरकरप्रति तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी तालुक्यातील सर्व खरेदी केंद्राला भेट देऊन धान खरेदीबाबत माहिती घेतली असता एकाही खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी धान विक्री केल्याचे दिसून आले नाही. यापूर्वी नारायणपूर व परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी महामंडळ व सरकारने काढलेल्या एकरी ९ क्विंटल ६० किलो धान खरेदी करण्याचा आदेश मागे घ्यावा तसेच अट रद्द करून एकरी किमान २० ते २५ क्विंटल धान खरेदी करण्यात यावी म्हणून चक्काजाम आंदोलन केले व निवेदने देऊन धान खरेदीची मर्यादा वाढविण्याची मागणी केली हाेती.
बाॅक्स
अनेकांचे धान शेतातच पडून
आधारभूत धान खरेदी केंद्रावर एकरी २० क्विंटलपर्यंत धान खरेदी करावी, या मागणीवर शासनाकडून तोडगा न निघाल्याने मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे धान शेतातच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. राज्य सरकार व महामंडळाने तत्काळ योग्य निर्णय घेऊन यावर तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुक्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.